महागाव तालुक्यातील शासकीय वस्तीगृह वर धान्य वितरणात गैरप्रकार? विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची तपासणी करण्याची मागणी

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील शासकीय व अनुदानित शाळांच्या वस्तीगृहासाठी शासनाकडून गहू व तांदूळ नियमितपणे पुरवठा केला जातो. मात्र हे धान्य प्रत्यक्षात विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचते का, याची प्रभावी पाहणी पुरवठा विभागाकडून होत नसल्याचा आरोप पुढे आला आहे.
तालुक्यातील काही मूकबधिर व अपंग शाळांमध्ये प्रत्यक्ष उपस्थित विद्यार्थ्यांची संख्या कमी असतानाही पटसंख्येवर जास्त विद्यार्थी दाखवून शासनाकडून पूर्ण धान्य उचलले जात असल्याची चर्चा आहे. विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी असूनही संपूर्ण धान्य उचलल्यामुळे उर्वरित धान्य काळ्या बाजारात विकले जात असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते जयंत चौधरी यांनी केला आहे.
तसेच समाज कल्याण विभागाच्या शासकीय महिला वस्तीगृह विद्यार्थिनींना गैरसोयीला सामोरे जावे लागत असून, नियमानुसार पौष्टिक आहार दिला जात नसल्याचेही निदर्शनास आले असल्याचे त्यांनी सांगितले.
ऑनलाइन चलन भरून धान्य उचलल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष वस्तीगृहावर जाऊन पंचनामा करणे आवश्यक आहे. मात्र अपंग व मूकबधिर शाळांवर तसेच शासनाच्या वस्तीगृहावर पुरवठा अधिकाऱ्यांनी अद्याप प्रत्यक्ष पाहणी केली नसल्याचे सांगितले जात आहे.
यामुळे शासनाच्या धान्याचा अपहार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती तपासून, धान्य साठ्याची मोजदाद करून तातडीने पंचनामा करण्यात यावा तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जयंत चौधरी यांनी केली आहे.



