शहर

हिमायतनगर शहरात भीषण पाणीटंचाईचे सावट; पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे नगराध्यक्ष शेख रफिक यांचे नागरिकांना आवाहन


हिमायतनगर:( तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम)
यंदा पावसाने ओढ दिल्याने शहरात आगामी काळात भीषण पाणीटंचाई उद्भवू नये तसेच भूगर्भातील पाण्याची खालावलेली पातळी लक्षात घेता, नागरिकांनी आतापासूनच पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन हिमायतनगरचे नगराध्यक्ष शेख रफिक यांनी केले आहे. पाणी हेच जीवन असून, त्याचे महत्त्व दुष्काळाच्या काळात प्रकर्षाने जाणवते. ऑक्टोबर महिन्यात उन्हाचा कडाका वाढू लागला असून पाणीटंचाईची समस्या तीव्र होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करणे आणि नासाडी टाळणे गरजेचे असल्याचे नगराध्यक्ष शेख रफिक यांनी नमूद केले.
घरातील दैनंदिन कामांमध्ये पाण्याचा अपव्यय टाळावा, तसेच शक्य तेथे वापरलेल्या पाण्याचा सुरक्षित पुनर्वापर करावा. स्थानिक प्रशासनाने उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेऊन पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच नागरिकांनी सार्वजनिक विहिरी, कूपनलिका आणि हातपंप यांच्या पाण्याचा वापर जपून करावा. शेतकरी बांधवांनी शेतीसाठी उपलब्ध पाण्याचे नियोजन करताना ठिबक सिंचन आणि तुषार सिंचनाचा वापर करावा, असे आवाहन नगराध्यक्ष शेख रफिक यांनी केले आहे.
चौकट
“पाण्याचा प्रत्येक थेंब अनमोल आहे. आज पाणी वाचवले, तरच उद्याची तहान भागवता येईल. त्यामुळे हिमायतनगरच्या नागरिकांनी पाणी बचतीचा संकल्प करून दुष्काळाच्या संकटाचा सामना करण्यासाठी पुढाकार घ्यावा.”
शेख रफिक, नगराध्यक्ष, हिमायतनगर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button