दुष्काळात मायक्रो फायनान्सचा विळखा; शेतकरी, मजुरांची आर्थिक लूट थांबवणार कोण?

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
४८ टक्के व्याजदराच्या आरोपांनी खळबळ; कर्जवाटप व वसुलीची चौकशी करण्याची नागरिकांची मागणी
महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव : महागाव तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकरी आणि शेतमजूर आर्थिक संकटाचा सामना करीत असताना मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कर्जवाटप आणि वसुली पद्धतीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. गरजेपोटी कर्ज घेणाऱ्या नागरिकांना व्याज आणि हप्त्यांच्या ओझ्याखाली दबावे लागत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. दोन लाख रुपयांचे कर्ज घेतल्यानंतर दोन वर्षांत दोन लाख ८० हजार रुपये परत करावे लागत असल्याचे सांगितले जात असून, काही कर्जांवर ४८ टक्क्यांपर्यंत व्याज आकारले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. मोबाईल, मोटारसायकल आणि टीव्हीसारख्या वस्तूंच्या खरेदीसाठीही कर्जाचा आधार घेतला जात असल्याने अनेक कुटुंबांच्या आर्थिक अडचणी वाढत असल्याची चर्चा आहे. काही शेतकऱ्यांनी विहिरीसाठी दोन लाख रुपये कर्ज घेतलेली बाब समोर आली आहे. शेतकरी ते भरता भरता परेशान असल्याचे चित्र दिसून आले.उत्पन्नाचे साधन मर्यादित असताना कर्जाचे हप्ते भरण्यासाठी शेतकरी आणि मजुरांची दमछाक होत आहे. त्यामुळे संबंधित मायक्रो फायनान्स संस्थांच्या कर्जवाटपाच्या अटी, प्रत्यक्ष व्याजदर, अतिरिक्त शुल्क आणि वसुलीच्या पद्धतींची शासनाने तातडीने चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दुष्काळी परिस्थितीत कर्जदारांना योग्य दिलासा मिळावा आणि नियमबाह्य वसुली होत असल्यास संबंधितांवर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आर्थिक अडचणींमुळे शेतकरी व मजूर कुटुंबांवर मानसिक ताण वाढण्याची भीतीही व्यक्त होत आहे. कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या गरीब कुटुंबांना संरक्षण देण्यासाठी प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करावा; अन्यथा वाढत्या आर्थिक संकटाला जबाबदार कोण, असा सवाल आता नागरिक उपस्थित करीत आहेत.
Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802



