
महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव : महागाव, उमरखेड आणि पुसद तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस साखर कारखान्याला पाठवताना वजनकाट्याबाबत विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. मागील वर्षी शेतकऱ्यांनी पाठवलेल्या उसाच्या वजनामध्ये मोठी तफावत आढळून आल्याचा अनुभव लक्षात घेता, यंदा शेतकऱ्यांनी स्वतःच्या उसाचे वजन करूनच ऊस कारखान्याकडे पाठवावा, अशी मागणी पुढे येत आहे.
यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत. शेतात राबून, घाम गाळून आणि मोठा खर्च करून पिकवलेल्या उसाला योग्य मोबदला मिळत नसल्याची भावना अनेक शेतकऱ्यांमध्ये आहे. त्यातच ऊस तोडणी, वाहतूक आणि वजनामध्ये तफावत निर्माण झाल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
स्वतःच्या वजनकाट्यावर वजन करूनच ऊस पाठवा!
शेतकऱ्यांनी ऊस तोडणी केल्यानंतर शक्य असल्यास गाडीचे वजन अधिकृत वजनकाट्यावर करून घ्यावे. वजनाची पावती जतन करावी आणि कारखान्यात पोहोचल्यानंतर मिळालेल्या वजनाच्या पावतीशी त्याची तुलना करावी. दोन्ही वजनांमध्ये तफावत आढळल्यास संबंधित कारखाना प्रशासनाकडे पुराव्यासह तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांच्या कष्टाचा मोबदला मिळणार कधी?
दुष्काळ, वाढता उत्पादन खर्च आणि शेतीमालाच्या मोबदल्याबाबतची चिंता यामुळे ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत. अशा परिस्थितीत उसाचे वजन पारदर्शक पद्धतीने होणे, वजनाची योग्य पावती मिळणे आणि उसाच्या मोबदल्यात कोणतीही तफावत राहू नये, याची जबाबदारी संबंधित कारखाना प्रशासनाने घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
महागाव, उमरखेड आणि पुसद तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जागरूक राहून आपल्या उसाचे वजन आणि वजनाच्या पावत्यांची पडताळणी करावी, जेणेकरून मेहनतीने पिकवलेल्या उसाचे नुकसान टाळता येईल, असे आवाहन ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.



