भक्तांवर काळाचा घाला!
माहूरहून परतताना टेम्पो दरीत कोसळला; दोघे ठार, तीन जण गंभीर जखमी

महागाव : शारदीय नवरात्रोत्सवात माहूर येथे रेणुका मातेचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या टेम्पोला भीषण अपघात झाला. यवतमाळ-माहूर मार्गावरील केरेली घाटात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास टेम्पो सुमारे १०० फूट खोल दरीत कोसळला. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भाविक रेणुका मातेचे दर्शन घेऊन यवतमाळकडे परतत होते. दरम्यान, केरेली घाटातील वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो थेट दरीत कोसळला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
दरीत कोसळलेल्या टेम्पोमधून मृतदेह आणि जखमींना बाहेर काढण्यात आले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

नवरात्रोत्सवाच्या काळात घडलेल्या या भीषण दुर्घटनेमुळे भाविकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. केरेली घाटातील धोकादायक वळणे आणि संरक्षण कठड्यांचा अभाव यामुळे अपघाताचा धोका वाढत असल्याचा मुद्दाही पुन्हा ऐरणीवर आला आहे. या मार्गावरील सुरक्षिततेसाठी संबंधित विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.



