किनवट-नांदेड रेल्वे मार्गावर मदनापूरजवळ रेल्वेची धडक; ३ ते ४ वर्षांची वाघीण ठार

(किनवट तालुका प्रतिनिधी)
किनवट ते नांदेड रेल्वे मार्गावरील मदनापूर परिसरात रेल्वेची धडक बसल्याने अंदाजे ३ ते ४ वर्षीय मादी वाघाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. मदनापूर येथील सोमेश्वर महादेव मंदिराजवळ शनिवार, १७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ही दुर्घटना उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली असता, मृत वाघिणीचे सर्व अवयव सुरक्षित असल्याचे आढळून आले; ज्यामुळे हा मृत्यू रेल्वेच्या धडकेमुळेच झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा उपवनसंरक्षक मनीषा पाटील, सहाय्यक वनसंरक्षक किरण चव्हाण, बोधडीचे वनपरिक्षेत्र अधिकारी सी.जी. पोतुलवार, किनवटचे वनपरिक्षेत्र अधिकारी धीरज मदने, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे प्रतिनिधी अतिद्र कट्टी आणि पशुवैद्यकीय अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
यानंतर सावरी वन आगार येथे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने मृत वाघिणीचे शवविच्छेदन करून आवश्यक नमुने घेतले आणि उपस्थित अधिकारी व पंचांच्या साक्षीने अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुर्दैवी दुर्घटनेमुळे रेल्वे मार्गावरील वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा तीव्रतेने ऐरणीवर आला आहे.



