फुलसांगवी येथील शासकीय गोदाम परिसरावर अतिक्रमण वरिष्ठांच्या पत्रानंतरही कारवाई नाही; स्वस्त धान्य परवानाधारकांचा संताप

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील फुलसांगवी येथील शासकीय धान्य गोदाम परिसरावर संपूर्ण अतिक्रमण करण्यात आले असून, महसूल प्रशासन अतिक्रमण काढण्यात असमर्थ ठरत असल्याची बाब समोर आली आहे. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी वारंवार पत्रव्यवहार करून संबंधित जागा मोकळी करून देण्याची मागणी केली असतानाही अद्याप ठोस कारवाई झालेली नाही.
सुमारे अर्धा एकर जागेवर शासकीय गोदाम असून, त्या ठिकाणाहून परिसरातील ४० ते ५० स्वस्त धान्य दुकानदारांना धान्य पुरवठा केला जाऊ शकतो. मात्र गेल्या पाच वर्षांपासून या गोदामात धान्य साठवणूक होत नसल्यामुळे संबंधित दुकानदारांना महागाव येथे जाऊन धान्य उचलावे लागत आहे. त्यामुळे वेळ आणि आर्थिक खर्च वाढत असल्याची तक्रार आहे.
गोदामाच्या संपूर्ण परिसरात काही दुकानदारांनी अतिक्रमण करून जागा व्यापल्यामुळे त्या ठिकाणी शासनाचे धान्य ठेवणे शक्य नसल्याचे जिल्हा पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पत्र देऊनही महसूल विभागाने अतिक्रमण हटविण्याची कारवाई केलेली नसल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, स्वस्त धान्य परवानाधारकांनी फुलसांगवी येथील गोदाम तातडीने सुरू करून तेथूनच धान्य वाटप करण्याची मागणी केली आहे. शासनाच्या जागेवरील अतिक्रमण काढून परिसर मोकळा करावा आणि राशन धान्य गोदामातून नियमित पुरवठा सुरू करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.



