हिवरा शिक्षण संस्थेचे मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे वसतिगृह बंद; विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात

महागाव, प्रतिनिधी : संजय नागरगोजे
हिवरा (संगम) येथे स्वतंत्रपूर्व काळात 1939 मध्ये स्थापन झालेले मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे निवासी वसतिगृह मागील कोविड काळापासून अद्यापही पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आले नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. संस्थेच्या व्यवस्थापनाच्या दुर्लक्षामुळे अनुसूचित जाती-जमाती, विमुक्त जाती, कुणबी तसेच खुल्या प्रवर्गातील सुमारे 62 विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाल्याची भावना पालक व कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
वसतिगृह बंद असल्याने येथे कार्यरत असलेल्या एका विधवा महिलेसह चार कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आल्याचे सांगितले जात आहे. वसतिगृह पूर्ववत सुरू करण्याच्या मागणीसाठी मागील वर्षी विजयादशमीच्या दिवशी कर्मचाऱ्यांना उपोषण करावे लागले होते. मात्र त्यावेळी संस्थाचालकांनी उपोषणस्थळी साधी भेटही दिली नसल्याची खंत कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.
उपोषणानंतर संस्थेकडून आश्वासने देण्यात आली, मात्र त्यानंतरही वसतिगृहाच्या कारभारात ठोस सुधारणा झाल्या नाहीत, असा आरोप करण्यात येत आहे. ऐन शैक्षणिक सत्राच्या मध्यंतरात वसतिगृह सुरू करण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे प्रवेश मिळविण्यात अडचणी निर्माण झाल्या. तरीही वसतिगृह अधीक्षकांनी 20 ते 25 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित केले. परंतु विद्यार्थ्यांना अन्नधान्याची कमतरता, नियमांनुसार सुविधा न मिळणे तसेच अर्वाच्य भाषेचा वापर अशा प्रकारांमुळे अनेक विद्यार्थ्यांनी वसतिगृह सोडल्याचे समोर आले आहे.
या सर्व प्रकाराचे खापर वसतिगृह अधीक्षकांवर फोडण्यात आल्याची खंतही व्यक्त करण्यात आली. नव्या शैक्षणिक सत्रासाठी वसतिगृह सुरू करण्यासंदर्भात आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे, जाहिरातीस परवानगी देणे आदी मागण्यांचे लेखी पत्र संस्थाचालक व वसतिगृह सचिवांना देण्यात आल्याचे समजते. मात्र महिनाभर उलटूनही यावर कोणताही निर्णय झालेला नसल्याने पालक व विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
इंग्रजकालीन परंपरा असलेले हे वसतिगृह बंद राहिल्यास ग्रामीण भागातील गरीब, मागासवर्गीय, शेतमजूर व स्थलांतरित कुटुंबातील विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात येईल, अशी भीती व्यक्त होत आहे. तसेच या वसतिगृहावर अवलंबून असलेल्या कर्मचाऱ्यांच्या उपजीविकेचाही प्रश्न गंभीर बनला आहे. वेळेत कार्यवाही न झाल्यास पुन्हा आमरण उपोषण करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
(बॉक्स)
“मी वसतिगृह अधीक्षक म्हणून गेल्या काही वर्षांपासून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हे मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे वसतिगृह सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहे. संस्थेकडे वेळोवेळी लेखी पत्रव्यवहार करून विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी जाहिरात देण्याची परवानगी, आवश्यक सुविधा आणि अन्नधान्य उपलब्ध करून देण्याची मागणी केली. मात्र आजपर्यंत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. हे वसतिगृह ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची जीवनरेखा आहे. संस्थाचालकांनी वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करावा आणि तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा.”
— विशाल कदम,
वसतिगृह अधीक्षक, हिवरा (संगम), ता. महागाव



