गोवंश वाहतुकीच्या पाठलाग; हल्ल्यात युवकाचा मृत्यू, महागाव शहर बंद

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
: महागाव परिसरात गोवंश वाहतुकीच्या संशयावरून झालेल्या पाठलागानंतर एका युवकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गजानन सुरशे असे मृत युवकाचे नाव असून, दगड व लाकडी हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर महागाव शहरातील अनेक दुकाने बंद ठेवण्यात आली असून परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बिजोरा टोल नाक्यापासून एका संशयित वाहनाचा पाठलाग करण्यात आला. हा पाठलाग सिनेस्टाईल पद्धतीने सुरू राहिल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान वाहन अडवून झालेल्या वादातून हल्ला झाला. यात गजानन सुरशे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी हलविण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. गाडीमधून जनावरे उतरताना फोटोमध्ये दिसत आहे
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू असून संबंधित संशयितांचा शोध घेतला जात आहे. सीसीटीव्ही फुटेज मध्ये गाडी व गोटमार करणारे व्यक्ती दिसू देत आहे
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, महागाव पुलावर काही संशयित व्यक्ती रात्रीच्या वेळी वारंवार दिसत असल्याची चर्चा आहे. यापूर्वीही मोहदी गावाजवळ एका अपघातग्रस्त वाहनात जनावरे बेशुद्ध करण्यासाठी वापरली जाणारी इंजेक्शने आढळून आल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. मात्र अशा घटनांमध्ये ठोस कारवाई न झाल्याची नाराजी व्यक्त होत आहे.
महागाव तालुक्यात मागील काही काळात जनावरे चोरी व तस्करीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित गुन्हेगारांवर कठोर कारवाई करून जनावर तस्करीवर आळा घालावा, अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे.
दरम्यान, पोलिस प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून तपास पूर्ण झाल्यानंतरच घटनेचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे सांगितले आहे.



