एकदिवसीय सफाईचा ‘शो’ की खरे काम? महागावात घाणीवरून नागरिकांचा संताप

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव : महागाव नगरपंचायत हद्दीत एक दिवसासाठी करण्यात आलेल्या साफसफाई मोहिमेवर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “एक दिवस झाडू मारून काय साध्य झाले?” असा सवाल करत शहरात आजही ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले असल्याचे चित्र समोर येत आहे. नाल्यांची नियमित साफसफाई होत नसल्याने अस्वच्छतेचा प्रश्न कायम आहे.
उमरखेड येथून सुमारे २५ ते ३० कामगार बोलावून एक दिवसाची सफाई मोहीम राबवण्यात आली. भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी नितीन भुतडा यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम पार पडली. मात्र, ही केवळ एकदिवसीय “शो” ठरल्याची टीका नागरिकांकडून होत असून, पुढील ठोस कृती काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
राजकीय पार्श्वभूमीवरही चर्चा रंगत आहे. उमरखेड नगरपालिकेत १५ वर्षांची सत्ता गमावलेल्या नेतृत्वाने महागावात सर्वपक्षीय जुळवाजुळव करून रंजना दीपक आडे यांना केवळ आठ महिन्यांच्या कालावधीसाठी नगराध्यक्ष पद मिळवून दिल्याची चर्चा आहे. मात्र, प्रत्यक्ष कारभार उमरखेड येथूनच नियंत्रित होत असल्याचा आरोप होत आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभारी स्वरूपात कार्यरत असल्याने विविध प्रक्रिया नियमबाह्य पद्धतीने राबवल्या जात असल्याचेही निदर्शनास येत आहे. प्रभाग क्रमांक २ मध्ये ‘नमो उद्यान’ उभारण्यासाठी सुमारे एक कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. मात्र, नगरपंचायत हद्दीत खुल्या जागांची कमतरता असून बहुतेक ठिकाणी अतिक्रमण झालेले आहे.
सध्या महागावमध्ये अशी मोकळी जागा केवळ एकच उपलब्ध असल्याचे सांगितले जात असून, इतर लेआउटमधील खुल्या जागांवर मोठ्या प्रमाणात व्यावसायिक अतिक्रमण झाले आहे. या अतिक्रमणांवर कारवाई होणार का? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
दरम्यान, नगरपंचायत हद्दीत खुल्या जागा अतिक्रमणमुक्त न केल्यास जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे. तसेच सध्याचे व माजी नगरसेवक यांच्या अतिक्रमणांचाही भांडाफोड होणार असून, शासकीय जागांची विक्री करणाऱ्यांविरोधातही न्यायालयीन लढा उभारला जाईल, असे स्पष्ट मत व्यक्त करण्यात आले आहे.
एकीकडे स्वच्छतेचे दावे, तर दुसरीकडे वाढती घाण आणि अतिक्रमण यामुळे महागावात प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.



