Uncategorizedमहागाव

कासाळबेळ-सेवानगर संयुक्त गावाकडून नवनिर्वाचित संचालक नितीन भुतडा यांचा सत्कार!
वाघामाई मंदिर परिसरात सभामंडप उभारण्याचे आश्वासन; नाला संरक्षण भिंतीसाठी निधी देण्याची ग्वाही
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कामकाजात सुधारणा करून १०० दिवसांचा आराखडा तयार करणार


महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
कासाळबेळ : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी निवडून आलेले नितीन भुतडा यांचा कासाळबेळ व सेवानगर या संयुक्त गावाच्या वतीने १९ सप्टेंबर २०२६ रोजी वाघामाई जागृत मंदिर परिसरात सत्कार करून स्वागत करण्यात आले. नवरात्रोत्सवानिमित्त नवमीच्या देवीच्या कार्यक्रमासह आयोजित महाप्रसादाच्या सोहळ्यात हा स्वागत समारंभ पार पडला. यावेळी गावकऱ्यांनी विविध समस्या मांडल्या असता, त्यावर सकारात्मक भूमिका घेत नितीन भुतडा यांनी विकासकामांसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
वाघामाई मंदिरासाठी सभामंडप उभारणार!
कासाळबेळ येथील वाघामाई मंदिर हे संयुक्त गावाचे श्रद्धास्थान असून, नवरात्रोत्सवात येथे मोठ्या उत्साहात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मंदिर परिसरात भाविकांच्या सोयीसाठी सभामंडप उभारण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. या मागणीला प्रतिसाद देताना नितीन भुतडा यांनी पुढील नवरात्रोत्सवापर्यंत मंदिर परिसरात सभामंडपाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले. तसेच मंदिरालगतच्या नाल्याला संरक्षण भिंत बांधण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
विकासकामांमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. गावाच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने उपस्थित ग्रामस्थांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले.
जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी १०० दिवसांचा आराखडा!
यावेळी बोलताना नितीन भुतडा यांनी यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी १०० दिवसांचा आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे सांगितले. बँकेच्या विविध शाखांची पाहणी करून ग्राहकांना मिळणाऱ्या सुविधांचा आढावा घेतला जाईल. राष्ट्रीयीकृत बँकांप्रमाणेच ग्राहकांना सोयीस्कर आणि सुलभ सेवा उपलब्ध करून देण्यासाठी बँकेच्या शाखांमध्ये आवश्यक बदल करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
बँकेच्या कामकाजात सुधारणा करून शेतकरी, ठेवीदार आणि सर्वसामान्य ग्राहकांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम केले जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पंचायत समिती सदस्य मोहनराव करे होते. यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ. स्मिता पाटील कदम यांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष पवार, वरुडी येथील सोसायटीचे अध्यक्ष रामहरीअडकिने, भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष विलास कव्हाणे, माजी पंचायत समिती सदस्य संदीप पाटील, गावातील माजी सरपंच, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष, माजी सदस्य तसेच दोन्ही गावांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावाच्या विकासाच्या आश्वासनाने ग्रामस्थांमध्ये समाधान
वाघामाई मंदिर परिसरात सभामंडप उभारण्यासह नाल्याला संरक्षण भिंत बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मिळाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. गावाच्या श्रद्धास्थानाच्या परिसरात सभामंडप उभारल्यास धार्मिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि ग्रामस्थांच्या विविध बैठकांसाठी सुविधा उपलब्ध होणार आहेत.
या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन नंदू मस्के, पावडे, करे, साहेबराव करे आणि गावातील मित्रमंडळींनी केले होते. धार्मिक उत्सवाच्या निमित्ताने आयोजित या सत्कार समारंभात गावाच्या विकासाच्या प्रश्नांवर चर्चा झाल्याने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button