रस्त्याअभावी विधवा शेतकरी लक्ष्मीबाई अडकिने यांचे उपोषण!
हिवरा येथे सोयाबीनच्या गंजीजवळ आंदोलन; तहसील कार्यालयात रस्त्याचे प्रकरण प्रलंबित, जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी

महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव : शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. महागाव तालुक्यातील हिवरा येथील विधवा शेतकरी लक्ष्मीबाई अवधूत अडकिने यांनी शेतरस्त्याच्या मागणीसाठी सोयाबीनच्या गंजीजवळ उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. शेतरस्त्याचे प्रकरण तहसील कार्यालयात प्रलंबित असल्याने न्यायासाठी त्यांना आंदोलन करावे लागत असल्याचे चित्र समोर आले आहे.
महागाव तालुक्यात शेतरस्त्यांसंदर्भातील अनेक प्रकरणे महसूल कार्यालयात प्रलंबित असल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून केली जात आहे. वेणी येथील शिंदे यांच्याही शेतरस्त्याचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नसल्याचे सांगितले जात आहे. अनेक शेतकऱ्यांची प्रकरणे कागदपत्रे आणि कार्यालयीन प्रक्रियेत अडकून पडल्याने प्रत्यक्ष रस्ता मिळण्यास विलंब होत असल्याचा आरोप होत आहे.
महसूल मंत्र्यांच्या आदेशानंतरही शेतकरी रस्त्याच्या प्रतीक्षेत!
शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता उपलब्ध करून देण्याबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निर्देश दिलेले असतानाही महागाव तालुक्यात शेतरस्त्यांचे प्रश्न कायम असल्याची चर्चा आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी रस्ता मिळत नसेल, तर शेतीची कामे करायची कशी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शेतीमालाची वाहतूक, पेरणी, कापणी आणि इतर कृषी कामांसाठी शेतरस्ता अत्यंत महत्त्वाचा असतो. मात्र, रस्त्याअभावी शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असून, प्रशासनाकडून वेळेत निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी
एकीकडे शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करीत असताना दुसरीकडे शेतरस्त्यासाठी उपोषण करावे लागत असल्याने महागाव तालुक्यातील प्रशासकीय कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केवळ कागदोपत्री कार्यवाही न करता प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करून निर्णय घेण्याची गरज आहे.
हिवरा येथील लक्ष्मीबाई अडकिने यांच्या शेतरस्त्याचा प्रश्न तातडीने सोडवावा, तसेच तालुक्यातील प्रलंबित शेतरस्त्यांच्या प्रकरणांचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे.
शेतकऱ्याला आपल्या शेतात जाण्यासाठीही उपोषण करावे लागत असेल, तर या परिस्थितीला जबाबदार कोण? जिल्हाधिकारी या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना रस्त्याचा मार्ग मोकळा करून देतील का? असा सवाल महागाव तालुक्यातून उपस्थित केला जात आहे.



