
नगरपंचायत अध्यक्ष रंजना आडे यांचा पुढाकार; ज्येष्ठ नेते संभाजी नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाही, बंधाऱ्यातील गाळ काढण्याचीही गरज
महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव : शहरातील पाणीटंचाईचा प्रश्न लक्षात घेऊन दैनिक महासागर वृत्तपत्राने पूस नदीवरील महादेव मंदिराजवळील सिमेंट बंधाऱ्याबाबत वारंवार वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. अखेर या बातम्यांची दखल घेत १७ ऑगस्ट रोजी बंधाऱ्याला लोखंडी गेट बसविण्यात आले. त्यामुळे बंधाऱ्यात पाणी साठवून ठेवण्यास मदत होणार असून महागाव शहरातील विहिरी व बोअरवेलच्या पाणीपातळीत वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
महागाव शहरालगत असलेल्या पूस नदीवरील महादेव मंदिराजवळील सिमेंट बंधाऱ्याला मागील दोन ते तीन वर्षांपासून प्लेटा नसल्याने नदीतील पाणी वाहून जात होते. परिणामी बंधाऱ्यात पुरेसा पाणीसाठा राहत नव्हता. याचा परिणाम परिसरातील भूजल पातळीवर होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, याच बंधाऱ्याला योग्य वेळी प्लेटा अथवा गेट लावून पाणी अडविल्यास शहरातील विहिरी आणि बोअरवेलच्या पाणीपातळीत वाढ होत असल्याचा अनुभव नागरिकांनी व्यक्त केला आहे.
दैनिक महासागरच्या वृत्ताची दखल
पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर बंधाऱ्यात पाणी अडविण्याची गरज लक्षात घेऊन दैनिक महासागर वृत्तपत्राच्या प्रतिनिधींनी या समस्येकडे वारंवार लक्ष वेधले. वृत्तपत्राच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. अखेर या वृत्तांची दखल घेत ज्येष्ठ नेते संभाजी नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायत अध्यक्ष रंजना आडे, उपाध्यक्ष व नगरसेवकांनी या प्रश्नाकडे लक्ष दिले. त्यानंतर बंधाऱ्याला लोखंडी गेट बसविण्यात आले.
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांकडून पाणी नियोजनासंदर्भात पत्र प्राप्त झाल्यानंतर महागाव नगरपंचायत हद्दीतील पाणीस्थितीचा आढावा घेण्यासाठी नगरपंचायतीमध्ये तातडीची बैठक 21 ऑगस्ट रोजी मीटिंग घेण्याचची माहिती आहे.
बंधाऱ्यातील गाळ काढणे आवश्यक
बंधाऱ्याला लोखंडी गेट बसविण्यात आले असले, तरी बंधाऱ्याच्या परिसरात साचलेला गाळ काढणे आवश्यक आहे. गाळामुळे पाणी साठविण्याची क्षमता कमी होत असल्यास त्याचा परिणाम अपेक्षित पाणीसाठ्यावर होऊ शकतो. त्यामुळे संबंधित यंत्रणेने बंधाऱ्यातील गाळ काढण्याकडेही लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
बंधाऱ्यात मुबलक पाणीसाठा झाल्यास महागाव शहरातील विहिरी आणि बोअरवेलच्या पाणीपातळीला आधार मिळू शकतो. त्यामुळे केवळ गेट बसवून थांबण्याऐवजी बंधाऱ्याची पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे महत्त्वाचे ठरणार आहे.
वेणी धरणाच्या पाण्यामुळे परिसराला दिलासा मिळण्याची अपेक्षा
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार वेणी धरणातील पाणी पूस नदीत सोडण्याची कार्यवाही झाल्यास त्याचा लाभ महागाव, कळगाव आणि वाकोडी या गावांना होण्याची अपेक्षा आहे. तसेच नदीतून पुढे वाहणाऱ्या पाण्याचा करंजखेड आणि हिवरा परिसरालाही फायदा होऊ शकतो. मात्र, या पाण्याचा प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी योग्य नियोजन आणि पाणीसाठवण आवश्यक आहे.
सध्या दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने पाण्याचा प्रत्येक थेंब जपणे गरजेचे आहे. नदी, नाले आणि बंधाऱ्यांमध्ये पाणी अडविणे, भूजल पातळी वाढविण्यासाठी उपाययोजना करणे आणि पाण्याचा अपव्यय टाळणे ही काळाची गरज बनली आहे.
पाणी अडवा, पाणी जिरवा; झाडे लावा, माणसं वाचवा!
पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या प्रयत्नांसोबत नागरिकांचाही सहभाग महत्त्वाचा आहे. पावसाचे पाणी अडविणे, पाणी जमिनीत जिरविणे, वृक्षारोपण करणे आणि लावलेल्या झाडांचे संगोपन करणे आवश्यक आहे.
दैनिक महासागरच्या वृत्तामुळे व उंबरखेड वार्ता मुळे पूस नदीवरील बंधाऱ्याला लोखंडी गेट बसविण्याच्या कार्यवाहीला चालना मिळाली असून, आता बंधाऱ्यातील गाळ काढून पाणीसाठा वाढविण्याची मागणी पुढे आली आहे. आगामी पिढ्यांसाठी पाणी जपायचे असेल, तर आजच जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देणे आवश्यक आहे.
पाणी अडवा, पाणी जिरवा; झाडे लावा, माणसं वाचवा!



