कर्जाच्या विळख्यात शेतकऱ्याचा मृत्यू; महागाव तालुक्यात आत्महत्यांचे सत्र थांबेना!

तीन एकर शेती, शेतीकर्ज आणि बचत गटाच्या कर्जाचा बोजा असल्याची माहिती
महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव : तालुक्यातील सेनंद येथील विजय धर्मा पवार (वय ४०) या शेतकऱ्याचा विषारी औषध प्राशन केल्यानंतर उपचारादरम्यान यवतमाळ येथे मृत्यू झाला. ही घटना १७ ऑक्टोबर २०२६ रोजी घडली. विजय पवार यांच्याकडे तीन एकर शेती होती. शेतीकर्जासह बचत गटाच्या कर्जाची जबाबदारी असल्याने ते आर्थिक अडचणीत असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास विजय पवार यांनी विषारी औषध प्राशन केले. प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना सवना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून पुढील उपचारांसाठी यवतमाळ येथे हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
विजय पवार हे यापूर्वी महागाव येथे इलेक्ट्रिकल व मेकॅनिकल कामेही करीत होते. दुष्काळसदृश परिस्थिती, शेतीतील अनिश्चित उत्पन्न आणि कर्जाचा वाढता बोजा यामुळे शेतकऱ्यांसमोरील आर्थिक संकट गंभीर बनले आहे.
महागाव तालुक्यात शेतकरी आत्महत्यांच्या घटना वारंवार समोर येत असल्याने शेतकऱ्यांच्या समस्यांवर ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे. पीक नुकसानीची भरपाई, आर्थिक मदत, कर्जविषयक मार्गदर्शन आणि शासकीय योजनांचा लाभ गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे.
शेतकरी संकटात असताना त्याला वेळेवर मदत मिळते का? शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी प्रशासनाकडून कोणत्या ठोस उपाययोजना केल्या जात आहेत? असे प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होत आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन आणि प्रशासनाने तातडीने प्रभावी पावले उचलण्याची गरज आहे.



