महागाव तालुक्यात सहकार क्षेत्रात खळबळ; थकीत कर्जदार सभासद अपात्र, निवडणूक प्रक्रिया पुन्हा सुरु

महागाव | प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील सहकारी संस्थांमध्ये थकीत कर्जदार सभासदांवर कारवाई करत सहाय्यक निबंधक, पुसद यांनी १३ मार्च २०२६ रोजी महत्त्वाचा आदेश काढला असून, यामुळे सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, कान्हा सोसायटीचे सात सभासद थकीत कर्जदार असल्यामुळे अपात्र ठरविण्यात आले आहेत. संबंधित आदेशाचे पत्र सोसायटीच्या सचिवांना प्राप्त झाले असून, या कारवाईनंतर त्या संस्थेवर प्रशासक नियुक्त होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
तसेच, वनोली सोसायटीचे चार सभासद देखील अपात्र करण्यात आले आहेत. याशिवाय, तालुक्यातील इतर काही सोसायटींमध्ये तक्रारीनंतर थकीत कर्जदार सभासदांना अपात्र ठरविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
या घडामोडींमुळे मध्यवर्ती बँकेच्या निवडणूक प्रक्रियेवर थेट परिणाम झाला आहे. यापूर्वी सोसायट्यांकडून निवडणुकीसाठी प्रतिनिधी पाठविण्यात आले होते, मात्र न्यायालयीन स्थगितीमुळे (स्टे) प्रक्रिया रखडली. दरम्यान, मार्च महिना उलटल्यामुळे आता नवीन आर्थिक वर्षात निवडणूक घेण्यासाठी नवीन मतदार यादी तयार करणे आवश्यक ठरणार आहे.
त्यामुळे, आधी पाठविलेल्या उमेदवारांची प्रक्रिया रद्द होऊन, नव्याने उमेदवार व मतदार यादी तयार करूनच मध्यवर्ती बँकेची निवडणूक घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या सर्व घडामोडींमुळे महागाव तालुक्यातील सहकार क्षेत्रात चर्चेला उधाण आले असून, पुढील राजकीय व प्रशासकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.



