दारू दुकान व बारविरोधात महिलांचे आंदोलन; १६ एप्रिलला गुप्त मतदान, नगरसेवकांचे पितळ उघडे

महागाव प्रतिनिधी संजय नाउघडेजे
महागाव : शहरातील देशी दारू दुकान व शेजारील बीअर बारविरोधात स्थानिक महिलांनी छेडलेल्या आंदोलनाने आता निर्णायक टप्पा गाठला असून, संबंधित दुकान सुरू ठेवायचे की बंद करायचे याचा अंतिम निर्णय १६ एप्रिल २०२६ रोजी गुप्त मतदानाद्वारे घेण्यात येणार आहे.
यापूर्वी काही नगरसेवकांनी दारू दुकानाला एनओसी देण्यासाठी सहकार्याचा ठराव घेतल्याचा आरोप होत होता. मात्र, नव्या नगराध्यक्षांची नियुक्ती होताच दारू दुकान बंद करण्यासाठी प्रशासनात मोठ्या हालचाली सुरू झाल्या असून, या प्रकरणात संबंधितांचे पितळ उघडे पडल्याची चर्चा शहरात रंगली आहे.
महिलांनी दिलेल्या निवेदनातील सह्यांची तपासणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने ७ मार्च रोजी केली. तपासणीत एकूण ४२ सह्या वैध ठरल्या. ही संख्या एकूण सह्यांच्या २५ टक्क्यांपेक्षा अधिक असल्याने जिल्हाधिकारी विकास मीना यांनी गुप्त मतदान प्रक्रिया राबवण्याचे आदेश दिले.
दरम्यान, संबंधित आदेश नगरपंचायतीपर्यंत वेळेत न पोहोचल्यामुळे निर्णय प्रक्रियेत विलंब झाल्याचा आरोप नगराध्यक्ष रंजना आडे व नगरसेविका जयश्रीताई नरवाडे यांनी केला आहे. स्थानिक पातळीवर हा मुद्दा उचलल्यानंतर नगरपंचायत प्रशासनाने हालचाल करत अखेर मतदानाची तारीख जाहीर केली.
प्रभाग क्रमांक १ मधील के. वसंतरावजी नाईक यांच्या तेलचित्राजवळ असलेल्या सीएल-३ क्रमांक ७२ परवानाधारक देशी दारू दुकान व शेजारील बीअर बार बंद करण्याची मागणी महिलांकडून करण्यात आली आहे.
१६ एप्रिल २०२६ रोजी कन्या शाळेत मतदान प्रक्रिया पार पडणार असून, ‘आडवी बाटली’ या चिन्हाला मतदान झाल्यास संबंधित दारू दुकान व बीअर बार दोन्ही बंद करण्याचा निर्णय अमलात येणार आहे.



