शहर

आमदार किसनराव वानखेडे यांच्या प्रयत्नांना यश; देवसरीतील शेतकऱ्याला दिलासा — मात्र महागावातील शेतकरी अजूनही वंचित?


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
किसनराव वानखेडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे देवसरी येथील शेतकरी सौ. ज्योतीताई चक्रधर देवसरकर यांना अखेर न्याय मिळाला असून, त्यांच्या जळालेल्या ऊस पिकासाठी महावितरण कडून ₹१,६५,३८५ इतकी आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे.
देवसरी येथील शेतकरी ज्योतीताई देवसरकर यांचा ऊस जळाल्यामुळे त्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. या प्रकरणाची तात्काळ दखल घेत आमदार वानखेडे यांनी हे प्रकरण विधान भवनात मांडले तसेच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही प्रशासनाचे लक्ष वेधले. जिल्हाधिकारी व महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क साधत त्यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला. वेळप्रसंगी अधिकाऱ्यांना जाब विचारत त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि अखेर पीडित शेतकऱ्याला न्याय मिळवून दिला.
या मदतीमुळे संबंधित कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला असून, आमदार वानखेडे, महावितरण अधिकारी व प्रशासनाच्या कार्यशैलीचे परिसरात कौतुक होत आहे.
मात्र महागावातील शेतकरी अजूनही न्यायापासून दूर?
दरम्यान, उमरखेड–महागाव मतदारसंघातच महागाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचा ऊस जळाल्याच्या घटना घडल्या होत्या. विशेषतः नरवाडे लेवा परिसरातील देशमुख यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र या प्रकरणांमध्ये अद्याप ठोस मदत किंवा न्याय मिळाल्याचे दिसून येत नाही.
उमरखेडमध्ये तात्काळ कारवाई होऊन मदत मिळत असताना, महागावातील शेतकरी मात्र वंचित राहिल्याची भावना व्यक्त होत आहे. “एकाच मतदारसंघात असा दुजाभाव का?” असा प्रश्न आता शेतकरी वर्गातून उपस्थित होत आहे.
सर्व पीडित शेतकऱ्यांना न्यायाची मागणी
महागाव तालुक्यातील ऊस जळीतग्रस्त सर्व शेतकऱ्यांना देखील देवसरीप्रमाणेच न्याय मिळावा, अशी जोरदार मागणी होत आहे. आमदारांनी या प्रकरणाकडे लक्ष देत सर्व शेतकऱ्यांना समान न्याय द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
उपस्थित मान्यवर
यावेळी अंकुशजी देवसरकर, अधिक्षक अभियंता श्री. पागृत, कार्यकारी अभियंता आकांक्षा मेश्राम, प्रकाश इंगोले, राजेंद्र क्षीरसागर, कपिल प्रसाद, राकेश रंजन, बालाजी वानखेडे, जगदेवराव देवसरकर, श्रीधर देवसरकर, परमानंद कदम, चंद्रमणी सावतकर, संजय देवसरकर, गजानन देवसरकर, पवन गिरी, डॉ. आनंदराव राणे, अतुल देवसरकर, संदीप देवसरकर, राजेश देवसरकर, बंडू देवसरकर, प्रदीप देवसरकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button