उमरखेड प्रेस क्लबची लढाई; पत्रकाराला न्याय मिळणार का?” – प्रेस क्लबचा तीव्र संताप

सहसंपादक शेख मुजाहिद
उमरखेड : अन्याय, अत्याचार व गोरगरीब जनतेच्या हक्कासाठी लेखणीच्या जोरावर लढणाऱ्या पत्रकारावरच पोलिसांकडून खोटे गुन्हे दाखल केल्याची धक्कादायक घटना उमरखेड येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे पत्रकार संघटनांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
उमरखेड प्रेस क्लबचे अध्यक्ष शामभाऊ धुळे, उपाध्यक्ष गजानन वानखेडे व सचिव सिद्धार्थ दिवेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, धाडस 007 या युट्यूब न्यूज चॅनलचे संपादक अमित वसंतराव देशमुख यांनी तालुक्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात सातत्याने आवाज उठवला होता.
दि. 10 मार्च 2026 रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे उमरखेड पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध दारू विक्री, जुगार, गांजा, गुटखा, मटका व अवैध वाहतूक याबाबत तक्रार करण्यात आली होती. यामुळे संतप्त झालेल्या संबंधित ठाणेदारांनी आकसापोटी कारवाई केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
त्यानंतर दि. 12 मार्च 2026 रोजी रात्री पत्रकार म्हणून माहिती घेण्यासाठी पोलीस स्टेशनला गेलेल्या अमित देशमुख यांच्यावर शासकीय कामात अडथळा व जातीय तेढ निर्माण केल्यासारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे, हे गुन्हे मध्यरात्री उशिरा नोंदवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
एमपीएससीची तयारी करणाऱ्या व समाजहितासाठी कार्य करणाऱ्या एका सुशिक्षित युवकावर अशा प्रकारे खोटे गुन्हे दाखल करून त्याचे शैक्षणिक व सामाजिक आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
या घटनेचा निषेध करत उमरखेड प्रेस क्लबने मागणी केली आहे की, संबंधित ठाणेदार शंकर पांचाळ यांची तात्काळ खातेनिहाय चौकशी करावी
त्यांचे त्वरित स्थानांतरण करण्यात यावे
वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत निष्पक्ष चौकशी करून पत्रकार अमित देशमुख यांच्यावर दाखल गुन्हे मागे घ्यावेत
पत्रकारांना संरक्षण देण्यात यावे
जर या प्रकरणात तात्काळ कारवाई झाली नाही, तर पत्रकार संघटनांकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.



