शहर

महागावातील इंग्लिश मीडियम शाळांवर प्रश्नचिन्ह; CBSEच्या नावाखाली विद्यार्थ्यांची लूट? शिक्षण विभागाचे दुर्लक्ष; “CBSE पॅटर्न”च्या नावाखाली पालकांची दिशाभूल असल्याचा आरोप


महागाव | प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव शहरातील काही इंग्लिश मीडियम शाळांच्या कारभाराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असून, “CBSE”च्या नावाखाली विद्यार्थ्यांची दिशाभूल करून प्रवेश घेतल्याचे आरोप समोर येत आहेत. प्रत्यक्षात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची (CBSE) मान्यता नसतानाही “CBSE पॅटर्न”चा दावा करून पालकांकडून मोठ्या प्रमाणात शुल्क आकारले जात असल्याची चर्चा शहरात रंगली आहे.
“CBSE पॅटर्न” की फसवणूक?
शिक्षणाचा दर्जा, प्रशिक्षित शिक्षक व आवश्यक सुविधा नसतानाही काही शाळा स्वतःला “CBSE पॅटर्न” असल्याचे सांगत आहेत. दहावी-बारावी पास शिक्षकांकडून अध्यापन घेतले जात असल्याचा आरोप पालकांकडून केला जात आहे. परिणामी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर गंभीर परिणाम होत असल्याचे चित्र आहे.
शिक्षणाचा दर्जा खालावला?
आकर्षक इमारती, गॅदरिंग व विविध कार्यक्रमांच्या आडून शिक्षणाचा दर्जा खालावत असल्याची तक्रार पुढे येत आहे. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना साधे गणित (गुणाकार) सुद्धा नीट येत नसल्याचे उदाहरणे समोर येत आहेत. तरीदेखील “इंग्लिश मीडियम” व “फ्री सुविधा”च्या नावाखाली दरवर्षी २५ ते ३० हजार रुपये शुल्क आकारले जात असल्याचा आरोप आहे.
अपात्र शिक्षकांचा प्रश्न
अनेक शाळांमध्ये बी.एड./डी.एड. पात्रता नसलेले शिक्षक कार्यरत असल्याचे समोर येत आहे. प्रशिक्षित शिक्षकांची कमतरता ही चिंतेची बाब असून, यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर परिणाम होत असल्याची पालकांची तक्रार आहे.
जिल्हा परिषद शाळा ठरत आहेत पर्याय
याउलट, जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रशिक्षित व पात्र शिक्षकांकडून शिक्षण दिले जात असून, कमी खर्चात दर्जेदार शिक्षण मिळत असल्याचे वास्तव आहे. अशा शाळांमधून शिकलेले अनेक विद्यार्थी आज उच्च पदांवर कार्यरत आहेत.
पालकांना आवाहन
पालकांनी केवळ शाळेची इमारत, देखावा किंवा “CBSE” नाव पाहून प्रवेश घेऊ नये. संबंधित शाळेला प्रत्यक्ष CBSE मान्यता आहे का, शिक्षकांची शैक्षणिक पात्रता व अनुभव काय आहे, याची खातरजमा करणे अत्यावश्यक आहे.
शिक्षणाच्या नावाखाली सुरू असलेल्या या “व्यवसायावर” शिक्षण विभागाने लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी पालक व नागरिकांकडून जोर धरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button