Uncategorized

काळी (दौ.) वनपरिक्षेत्रात रोह्याची कत्तल! पोखरी घाटाजवळ शिकाऱ्यांकडून नीलगाईची निर्घृण हत्या वनविभागाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा प्रश्नचिन्ह


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यात येणाऱ्या काळी (दौ.) वनपरिक्षेत्रातील पोखरी घाट परिसरात पुन्हा एकदा नीलगाई (रोही)ची निर्घृण शिकार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात शिकाऱ्यांनी सापळा लावून नीलगाई पकडली व धारदार शस्त्राने तिची हत्या करून काही अवयव कापून नेल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून वनविभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 10 मार्च रोजी स्थानिक नागरिकांना पोखरी शिवारातील घाट परिसरात नीलगाईचा मृतदेह अस्ताव्यस्त अवस्थेत आढळून आला. मृतदेहाची पाहणी केली असता हा प्रकार वन्य प्राण्यांच्या हल्ल्याचा नसून काही अज्ञात व्यक्तींनी केलेल्या शिकारीचा असल्याचे स्पष्ट होत आहे. शिकाऱ्यांनी नीलगाईचे पाय, पोटातील अवयव तसेच मोठ्या प्रमाणात मांस कापून नेल्याचे दिसून आले.
या घटनेबाबत काळी (दौ.) वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी सम्राट मेश्राम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, संबंधित प्राण्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येत असून तपास सुरू आहे. त्यानंतर पुढील माहिती देण्यात येईल.
दरम्यान, या प्रकारामुळे वन विभागाच्या गस्त व्यवस्था व देखरेखीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे याच वनपरिक्षेत्रात 16 एप्रिल 2024 रोजी तीन नीलगाईंची शिकार झाल्याची घटना घडली होती. त्या वेळीही वनविभागाची यंत्रणा निष्क्रिय ठरल्याने अखेर स्थानिक गुन्हे शाखेला हस्तक्षेप करावा लागला होता. त्या प्रकरणात सात आरोपींना अटक करण्यात आली होती, तर दोन आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती आहे.
पुन्हा एकदा अशा प्रकारची घटना घडल्याने वन विभागाच्या निष्क्रियतेवर स्थानिक नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वन्यजीव संरक्षणाची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांनी वेळेवर कठोर कारवाई न केल्यास शिकाऱ्यांचे धाडस वाढत असल्याची भावना परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत.
या पार्श्वभूमीवर नीलगाईच्या ताज्या शिकारीची सखोल चौकशी करून दोषींना तत्काळ अटक करावी काळी वन परिक्षेत्र अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे सागवान कटाई व शिकारीचे प्रमाण वाढले आहे. तसेच वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये संबंधित जबाबदारांवरही कारवाई करावी, अशी मागणी वन्यजीव प्रेमींमधून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button