शहर

ग्रामपंचायत कामांमध्ये बनावट सह्यांचा संशय चौकशी अहवालात गंभीर अनियमितता उघड; सचिव, सरपंच, अधिकारी व ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्याची शिफारस


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव पंचायत समिती अंतर्गत एका ग्रामपंचायतीतील विविध विकास कामांमध्ये गंभीर अनियमितता झाल्याचा धक्कादायक प्रकार चौकशीत समोर आला असून सचिव, सरपंच, संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
तक्रारदार अमजद खान अयुब खान पठाण यांनी दिलेल्या लेखी तक्रारीच्या अनुषंगाने संपूर्ण ग्रामपंचायतीच्या विकास कामांची चौकशी करण्यात आली. या चौकशीदरम्यान काही कामांचे मोजमाप व मूल्यांकन प्रत्यक्ष स्थळाला भेट न देता तयार करण्यात आल्याचे निदर्शनास आले असून त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
चौकशी अहवालानुसार मोजमाप पुस्तिकेतील (एमबी) पान क्रमांक ५७ व ५८ वर नोंदविण्यात आलेले मूल्यांकन संशयास्पद असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच त्यावरील सही व स्वाक्षऱ्यांची सत्यता तपासण्याची आवश्यकता असून त्या बनावट असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
याशिवाय, पाच विकास कामांच्या पूर्णत्व प्रमाणपत्रांवर कनिष्ठ अभियंता, उपअभियंता आणि गट विकास अधिकारी यांच्या सह्या बनावट असल्याची शक्यता चौकशीत पुढे आली आहे. त्यामुळे या सह्यांची तातडीने पडताळणी करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या नियमानुसार ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारात अनियमितता करणे, निधीचा अपहार करणे किंवा बनावट कागदपत्र तयार करणे हा फौजदारी गुन्हा असल्याने या प्रकरणात गुन्हा दाखल करणे आवश्यक असल्याचेही चौकशी अहवालात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, यापूर्वी पंचायत समिती कार्यालयातून एमबी रेकॉर्ड गायब झाल्याची बाबही समोर आली होती, त्यामुळे या प्रकरणाची गंभीरता अधिक वाढली आहे.
सदर चौकशी समितीने 10 मार्च 2026 रोजी आपला अहवाल गटविकास अधिकाऱ्यांकडे सादर केला असून लवकरच संबंधितांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
चौकशी अहवाल सादर झाल्यानंतर संबंधितांमध्ये मोठी खळबळ उडाली असून अनियमिततेतून अपहार झालेली रक्कमही वसूल होण्याची शक्यता असल्याने दोषींची धावपळ सुरू झाल्याची चर्चा स्थानिक स्तरावर होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button