विटांच्या गाडीवरून वाद; महिलेला मारहाण, जीवे मारण्याची धमकी — दखलपात्र गुन्हा दाखल नाही, महिलेला न्याय कसा मिळणार?

महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील साई ईजारा येथे घरकुल बांधकामासाठी येणाऱ्या विटांच्या गाडीवरून वाद होऊन महिलेला मारहाण केल्याची घटना 21 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडली. मात्र गंभीर स्वरूपाच्या आरोपांनंतरही दखलपात्र गुन्हा दाखल न झाल्याने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
सौ. निताबाई अरविंद राठोड (वय 33) यांनी पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण येथे दिलेल्या जबानीत नमूद केले की, त्यांच्या घराच्या बांधकामासाठी येणारी विटांची गाडी शेजारील चुलत सासरे शेषराव बंडू राठोड (वय 50) व त्यांचा मुलगा राजेश शेषराव राठोड (वय 30) यांनी घरासमोरून जाऊ दिली नाही. यावरून झालेल्या वादात दोघांनी निताबाई यांना केस धरून खाली पाडून मारहाण केली.
यावेळी सोडविण्यास आलेल्या पती अरविंद राठोड यांनाही मारण्याचा प्रयत्न करत, “तुमच्या बांधकामाची गाडी घराजवळ आली तर जीवे मारू,” अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
महिलेला मारहाण करणे व जीवे मारण्याची धमकी देणे हे दखलपात्र गुन्ह्यांच्या कक्षेत येते. तरीही या प्रकरणी केवळ अदखलपात्र (NCR) नोंद करण्यात आल्याने ग्रामीण पोलीस स्टेशनच्या कारभारावर नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
“महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी पोलिसांनी तातडीने चौकशी करून दखलपात्र गुन्हा दाखल करावा,” अशी मागणी तक्रारकर्त्यांनी केली आहे.
सदर प्रकरणी अदखलपात्र नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे



