पुसदमधील एटीएस कारवाईची पद्धतीवर टीका गुन्हेगारांवर कठोर कारवाईला पाठिंबा; मात्र निरपराधांना त्रास नको

पुसद प्रतिनिधी
पुसद शहरात १५ फेब्रुवारी रोजी एटीएसच्या छापेमारीच्या पार्श्वभूमीवर कुलजमाती विफाक महाराष्ट्राचे समन्वयक ॲड. नासिर खतीब नांदेड यांनी
पीडित कुटुंबाची भेट घेऊन विश्राम भवनात पत्रकार परिषद घेतली. यावेळी आयोजकांनी आपली भूमिका स्पष्ट मांडली. “जे खरोखर दोषी आहेत, त्यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई झालीच पाहिजे, याबद्दल आमचे दुमत नाही. मात्र पहाटे ३ वाजताच्या सुमारास तपासाच्या नावाखाली मोठ्या पोलिस बंदोबस्तामुळे पीडित कुटुंब, लहान मुले , वृद्ध नागरिक व परिसरात भीतीचे वातावरण पसरल्याचा उल्लेखही आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आला आहे.
दोषींना शिक्षा द्या, पण मुलांच्या शिक्षणाचे काय? तपासादरम्यान घरात असलेल्या लहान मुलांच्या आणि शालेय विद्यार्थ्यांच्या मानसिक स्थितीचा विचार केला जात नसल्याबद्दल परिषदेत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. “सध्या १० वी आणि १२ वीच्या बोर्ड परीक्षा सुरू आहेत. गुन्हेगारांना पकडण्याचा प्रशासनाला पूर्ण अधिकार आहे, पण त्यासाठी मुलांच्या शाळा, त्यांचा अभ्यास आणि त्यांचे भविष्य पणाला लावणे योग्य आहे का? पहाटे ३ चे सुमारास मोठ्या पोलिस बंदोबस्त आणि छापेमारीच्या दहशतीमुळे लहान मुले घाबरली असून, त्यांच्या कोमल मनावर याचा खोलवर परिणाम होत आहे,” असे मत यावेळी व्यक्त केले. कायद्याचा पूर्ण आदर असल्याचे स्पष्ट करतानाच तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य करणार असल्याचे यावेळी आयोजकांकडून सांगण्यात आले. परंतु तपासादरम्यान सामान्य नागरिकांचा सन्मान, आरोग्य व मानसिक स्थिती यांचा विचार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तपास प्रक्रिया कायदेशीर व पारदर्शक पद्धतीने राबवावी. निर्दोष कुटुंबांना अनावश्यक मानसिक त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रभावित कुटुंबांच्या परिस्थितीचा मानवी दृष्टिकोनातून विचार करावा. अफवा पसरू नयेत यासाठी अधिकृत व स्पष्ट माहिती जाहीर करावी. भविष्यात अशा कारवाया करताना वेळ, पद्धत व मानवी परिणाम यांचा संवेदनशीलतेने विचार करावा. “प्रशासनाने आपली गुप्तचर माहिती अधिक अचूक करावी आणि केवळ खऱ्या गुन्हेगारांवरच कारवाई करावी. तसेच एखाद्या व्यक्तीला संशयावरून ४ ते ५ वर्षे कायदेशीर कचाट्यात अडकवून ठेवले

जाते आणि नंतर ती व्यक्ती निर्दोष सुटते, या कटू सत्यावरही यावेळी प्रकाश टाकण्यात आला. “जर एखादी व्यक्ती ४ ते ५ वर्षांनंतर निर्दोष सिद्ध होते, तर तिच्या तारुण वयाच्या आणि कुटुंबाच्या झालेल्या नुकसानीचा हिशोब कोण देणार? निर्दोष सुटल्यानंतरही समाजात होणारी बदनामी कधीच पुसली जात नाही. म्हणूनच प्रशासनाने केवळ वास्तविक गुन्हेगारांनाच लक्ष्य करावे,” अशी मागणी करण्यात आली. तसेच पुसद शहरात शांतता राखण्यासाठी गुन्हेगारांना पकडणे जितके गरजेचे आहे, तितकेच निर्दोष लोक आणि मुलांच्या भविष्याचे रक्षण करणेही महत्त्वाचे आहे, हाच संदेश या पत्रकार परिषदेतून देण्यात आला.



