Uncategorized

पोफाळी जंगलात सागवानांचा संहार : वन विभागाचे नियंत्रण सुटले

  • सागवान तस्करांचा उघड धुमाकूळ; अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेने जंगल बोडखे
  • सहसंपादक शेख मुजाहिद
  • उमरखेड पोफाळी शिवारात सागवान तस्करांनी उघड धुमाकूळ घातला असून शेकडो सागवान झाडांची बुडासकट कत्तल झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पर्यावरण रक्षणाची जबाबदारी असलेल्या वन विभागाचे जंगल संरक्षणावरील नियंत्रण पूर्णतः सुटल्याचे चित्र या घटनेतून स्पष्ट होत आहे.
  • पोफाळी परिसरातील तरोडा भागात विविध ठिकाणी गोलाईप्राप्त शंभराहून अधिक सागवान झाडांची व गोलाई नसलेले सागाचे झाडांची सुद्धा अवैधरित्या तोड करण्यात आली आहे. जंगलात आजही कापलेल्या झाडांची थुटे, लाकडाचे तुकडे व भुसा पडलेला दिसून येत असून ही कत्तल नियोजनबद्ध पद्धतीने आणि अनेक दिवसांपासून सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे. ही तोड काल-परवाची नसून दीर्घकाळ चाललेल्या तस्करीचा परिणाम असल्याची चर्चा आहे.
  • धक्कादायक बाब म्हणजे एका शेतमालकाचा संमती बाँड घेऊन इतर सर्वे नंबरमधील सागवान झाडांची खुलेआम कत्तल केल्याचा आरोप पुढे आला आहे. तसेच, परिसरातील आदिवासी पट्ट्यातूनही मोठ्या प्रमाणात अवैध सागवान तोड झाल्याची चर्चा असून या संपूर्ण प्रकरणात नेमके सत्य काय, हे उघड करण्याचे आव्हान वन विभागासमोर उभे आहे.
  • सूत्रांच्या माहितीनुसार, अहोरात्र लाकूड कापण्याच्या यंत्रांचे आवाज परिसरात ऐकू येत असून कापलेले लाकूड वाहतूक व साठवणुकीसाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून केला जात आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली तस्करी स्थानिक यंत्रणेच्या संगनमताशिवाय शक्य नसल्याचा संशय व्यक्त होत आहे.
  • या पार्श्वभूमीवर राज्याचे वनमंत्री व मुख्य वनसंरक्षक यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी, अशी जोरदार मागणी नागरिक व पर्यावरणप्रेमी करत आहेत. पोफाळी क्षेत्रातील सागवान कत्तलीची उच्चस्तरीय चौकशी, संबंधित आरएफओ, वनरक्षक व कर्मचाऱ्यांची भूमिका तपासणे, मागील काही वर्षांतील तोड प्रकरणांचे ऑडिट करणे आणि दोषींवर कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. अन्यथा, उमरखेड तालुक्यातील जंगल फक्त नकाशावरच उरेल, अशी तीव्र भीती व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button