महागाव शहरात अनधिकृत मोबाईल टॉवरला न्यायालयाचा स्थगिती आदेश

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव शहरातील प्रभाग क्रमांक १४ (प्लॉट क्रमांक १३) येथे जगदीश नरवाडे यांनी कोणतीही अधिकृत परवानगी न घेता मोबाईल टॉवर उभारण्यासाठी संबंधित कंपनीसोबत करारनामा केला होता. सदर टॉवरसाठी स्थानिक स्वराज्य संस्था नगरपंचायत महागाव यांची कोणतीही एनओसी घेण्यात आलेली नव्हती, असे असतानाही मोबाईल टॉवरचे बांधकाम सुरू करण्यात आले होते.
या प्रकाराबाबत शेजारी राहणारे सामाजिक कार्यकर्ते विशाल डहाळे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी लेखी तक्रारी दाखल केल्या होत्या. टॉवर उभारण्यात आल्यास रेडिएशनमुळे ५० मीटर परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचा ठाम आक्षेप नागरिकांनी नोंदवला होता. विशेष म्हणजे हे बांधकाम ग्रामपंचायतीच्या खुल्या जागेवर सुरू करण्यात आले होते.
अनधिकृत बांधकाम तात्काळ थांबवावे, यासाठी महागाव येथील सामाजिक कार्यकर्ते विशाल डहाळे व अनंत नागरगोजे यांनी संबंधित विभागांकडे लेखी तक्रार केली होती. मात्र, कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने विशाल डहाळे यांनी न्यायालयात दाद मागितली.
आज दिनांक ९ जानेवारी २०२६ रोजी अॅड. सुदर्शन देशमुख यांनी विशाल डहाळे यांच्या वतीने महागाव येथील येथील दिवाणी न्यायालय यांनी संपूर्ण बाजू प्रभावीपणे मांडली. युक्तिवाद ऐकून न्यायालयाने एकतर्फी स्थगिती (Stay) देत मोबाईल टॉवरचे काम तात्काळ बंद करण्याचे आदेश पारित केले.
न्यायालयाचा आदेश पारित होताच नगरपंचायत महागाव तसेच संबंधित मोबाईल कंपनीला आदेशाची प्रत देण्यात आली. जनतेचा तीव्र विरोध असतानाही आणि आवश्यक परवानग्या न घेता टॉवर उभारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने हा करार चुकीचा असल्याचे न्यायालयात स्पष्ट झाले.
दरम्यान, टॉवरचे काम सुरू असताना अर्जुन वाटेगावकर यांच्या डोक्यावर लोखंडी रॉड पडून ते गंभीर जखमी झाले, त्यांना तात्काळ उपचारासाठी पुसद येथे हलविण्यात आले. या घटनेमुळे या कामामुळे नागरिकांचा जीवितास गंभीर धोका निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले. अखेर न्यायालयाच्या स्थगिती आदेशामुळे प्रभाग क्रमांक १४ मधील अनधिकृत मोबाईल टॉवरचे काम पूर्णतः बंद करण्यात आले, यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.



