Uncategorized

आश्रमशाळा आमनी (बु.) येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी


महागाव | प्रतिनिधी संजय नागरगोजे
प्रियदर्शनी शिक्षण संस्था संचालित टी. जी. देशमुख प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा तसेच वनमालाताई राठोड कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, आमनी (बु.), ता. महागाव, जि. यवतमाळ येथे दिनांक ३ जानेवारी २०२५ रोजी भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका व थोर समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांची १९५ वी जयंती अत्यंत उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षिका अंजली बोंपीलवार होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून मंजुषा गादेवार, निवेदिता भरकाडे, कांता चव्हाण, डिंपल जगताप व शरयू गवळी उपस्थित होत्या. तसेच मुख्याध्यापक जय वानखेडे, राजू कावडे व प्रा. विनोद राठोड यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाईंच्या जीवनकार्यावर आधारित भाषणे व गीतांचे सादरीकरण करून त्यांच्या विचारांचा जागर केला. सहभागी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरले इयत्ता पाचवीतील विद्यार्थिनी कुमारी आदिती अरुण राऊत हिचे “मी सावित्री बोलते” या विषयावरील प्रभावी भाषण. सावित्रीबाईंच्या वेशभूषेत सादर केलेल्या या भाषणातून “माझी जयंती साजरी करण्यापेक्षा माझे विचार आचरणात आणा” हा संदेश तिने ठामपणे मांडला. तिच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाबद्दल तिला विशेष प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात अंजली बोंपीलवार यांनी स्त्री शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाच्या माध्यमातून स्त्रियांना स्वाभिमान, समान हक्क व आत्मनिर्भरतेची दिशा कशी दिली, यावर सखोल मार्गदर्शन केले. केवळ जयंती साजरी न करता त्यांच्या विचारांचे आचरण करणे हीच खरी आदरांजली असल्याचे त्यांनी नमूद केले.
मुख्याध्यापक जय वानखेडे व राजू कावडे यांनी विद्यार्थ्यांना स्त्री शिक्षणाचे सामाजिक व शैक्षणिक महत्त्व स्पष्ट केले. तर प्रा. विनोद राठोड यांनी सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासह समाजातील वंचित घटकांच्या उन्नतीसाठी दिलेल्या अमूल्य योगदानावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी सोपान जाधव यांनी केले. सूत्रसंचालन निकिता कांबळे व पूजा राठोड यांनी प्रभावीपणे पार पाडले, तर आभार प्रदर्शन पूनम राठोड यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांनी केले होते. त्यांना सौ. डिंपल जगताप, प्रा. पवन जोशी, प्रा. अविनाश निकम, विरेश्वर सूर्यवंशी, भास्कर शिंदे, रविंद्र राठोड व आढाव यांचे मार्गदर्शन लाभले. छायाचित्रण प्रकाश येळणे व ज्ञानेश्वर काळे यांनी केले.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्त्री शिक्षण, सामाजिक समता व सावित्रीबाई फुले यांच्या विचारांबाबत जनजागृती निर्माण झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button