Uncategorized

हिवरा(संगम) येथील मुख्य चौकातील फळगाडे हटणार कधी?(अतिक्रमण न हटल्याने वाहतुक कोंडीची समस्या जैसे थेच)


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे


हिवरा(संगम)येथील मुख्य चौकातील फळगाड्यांमुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाल्याने या फळगाड्यांचे अतिक्रमण हटविण्याची मागणी नागरिकांनी निवेदनाद्वारे केली परंतु महिनाभराचा कालावधी उलटूनही सदर फळगाडे अद्याप हटविल्या गेले नसल्याने ग्राम पंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.
महागाव तालुक्यातील हिवरा(संगम) येथील मुख्य चौकातील गावात जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा फळगाडे चालकांनी अतिक्रमण केल्याने या गावातून येणाऱ्या वाहन धारकांना महामार्गावरील दोन्ही बाजूने येणारी वाहने दिसत नसल्याने अनेक छोटे मोठे अपघात घडले सुदैवाने यात किरकोळ जखमा होवुन जीवितहानी टळली.गावातील या मुख्य रस्त्यावर ग्राम पंचायत कार्यालय, आठवडी बाजार,बँक, सेतु सुविधा केंद्र ,कापड दुकान,सोने चांदीचे दुकान,तसेच विविध दुकानांची व्यापार पेठ असुन नागरिकांची मोठी वर्दळ या रस्त्यावर नेहमीच असते,त्याच प्रमाणे कनिष्ठ महाविद्यालय, हायस्कुल, इंग्लिश मिडीयम स्कुल असुन शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थिनी,विद्यार्थी यांना शाळेत जाण्यासाठी या ठिकाणी असलेल्या फळगाड्यांमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.महामार्गाचे बायपासचे काम अद्याप सुरू न झाल्याने आजमितीला वाहतुक गावातील जुन्याच रस्त्याने सुरू आहे. मुख्य चौकात वाहनाची मोठी गर्दी असते परंतु या फळ गाड्यामुळे गावातील वाहनांना अडथळा निर्माण झाल्याने वाहतुक कोंडीची नवी समस्या निर्माण झाली आहे.
त्यामुळे मुख्य चौकातील फळ गाड्यांचे अतिक्रमण हटविण्यात यावे याकरिता गावातील नागरिकांनी ग्राम पंचायत प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी केली . परंतु महिनाभराचा कालावधी उलटूनही यावर कोणतीच कारवाई न झाल्याने नागरिकांमधून नाराजीचा सुर उमटुन मुख्य चौकातील फळ गाड्यांचे अतिक्रमण ग्राम पंचायत प्रशासन कधी हटविणार असा सवाल तक्रारकर्ते नागरिक उपस्थित करीत आहेत.

चौकट

मुख्य चौकात वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे फळगाडे हटविण्या संदर्भात गावकऱ्यांनी ग्राम पंचायत कडे निवेदन दिले होते.त्यानुसार ग्राम पंचायतच्या मासिक सभेत ठराव घेवुन त्याअनुषंगाने जिल्हा पोलिस अधिक्षक यवतमाळ,गटविकास अधिकारी महागाव,ठाणेदार पोलिस स्टेशन महागाव यांना पत्र देण्यात आले असुन पोलिस प्रशासनाने जनभावनेची जाण ठेवून यावर कारवाई करणे गरजेचे आहे.
:- शरद पाटील (उपसरपंच ग्राम पंचायत हिवरा(संगम)

चौकट

फळगाडे न हटविल्यास कायदेशीर कारवाई करू.
हिवरा येथील मुख्य चौकात फळगाडे चालकांनी अतिक्रमण केल्याने वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली आहे.त्यामुळे हे गाडे हटविण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे.त्यानुसार सदर फळगाडे चालकांना आपले गाडे हटविण्यासंदर्भात वरिष्ठांच्या आदेशाने कायदेशीर मार्गाने नोटीस बजावण्यात आली आहे.परंतु त्यांनी अद्याप आपले गाडे हटविले नसल्याने पुढील कारवाई साठी महागाव पोलिस स्टेशनला पत्र देण्यात येणार आहे. त्यानंतर जर गाडे हटविण्यात आले नाही तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
: – व्हि.डि. सावळकर (ग्राम विकास अधिकारी ग्रा. पं.हिवरा(संगम)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button