Uncategorized

रेती तस्करांना महसूलचा दणका; दोन ट्रॅक्टर जप्त, हिवरा, जनुना येथे धडक कारवाई; प्रत्येकी एक ब्रास रेती जप्त, दंडात्मक कारवाई प्रस्तावित

फुलसांगवी, धनोडा, करंजखेड, वरुडी परिसरातील कथित अवैध रेती वाहतुकीकडे महसूलचे दुर्लक्ष का?

महागाव : प्रतिनिधी संजय नागरगोजे

महागाव तालुक्यात सुरू असलेल्या अवैध रेती उपसा व वाहतुकीविरोधात महसूल विभागाने धडक कारवाई सुरू केली आहे. हिवरा आणि जनुना येथे केलेल्या कारवाईत अवैध रेती वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडण्यात आले असून, दोन्ही वाहनांमधून प्रत्येकी एक ब्रास रेती जप्त करण्यात आली आहे. महसूल विभागाच्या या कारवाईमुळे रेती वाहतूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे.

प्रशिक्षणार्थी उपविभागीय अधिकारी ओमकार एकाळे आणि तहसीलदार अभय मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी गोविंद ठाकरे, बाळासाहेब माने, महसूल सहाय्यक दीपक चव्हाण व अक्षय बोनगुलवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

मंगळवारी रात्री हिवरा येथे अवैध रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर पथकाच्या निदर्शनास आले. त्यानंतर तत्काळ कारवाई करून वाहन ताब्यात घेण्यात आले. बुधवारी सकाळी जनुना येथेही अवैध रेती वाहतूक करणारे दुसरे ट्रॅक्टर पकडण्यात आले.

मंडळ अधिकारी व तलाठ्यांनी केलेल्या पंचनाम्यानुसार दोन्ही वाहनांमध्ये प्रत्येकी एक ब्रास रेती आढळून आली. हिवरा येथील ट्रॅक्टर समाधान धोत्रे, तर जनुना येथील ट्रॅक्टर रोहित नरवाडे यांच्या मालकीचे असल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे. यापूर्वी महागाव येथील जुन्या बसस्थानक परिसरातही तलाठी यांनी टिप्पर पकडून कारवाई केली होती.

दंड किती? कारवाईच्या पुढील टप्प्याकडे लक्ष

अवैध रेती वाहतूक करणाऱ्या दोन्ही वाहनांवर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता तसेच गौण खनिजांच्या उत्खनन व वाहतुकीसंदर्भातील नियमांनुसार दंडात्मक कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधितांकडून प्रशासन किती दंड वसूल करते, याकडे आता लक्ष लागले आहे.

बॉक्स

कारवाई झाली; पण काही ठिकाणी ‘दुर्लक्ष’ का?

महागाव तालुक्यातील हिवरा आणि जनुना येथे महसूल विभागाने केलेल्या कारवाईचे स्वागत होत असतानाच फुलसांगवी, धनोडा, करंजखेड आणि वरुडी परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध रेती उपसा व वाहतूक सुरू असल्याच्या तक्रारींकडे प्रशासनाचे लक्ष कधी जाणार?, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

या परिसरात जर अवैध रेती वाहतूक होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या असतील, तर त्याची प्रत्यक्ष पाहणी करून कारवाई का करण्यात आली नाही, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. त्यामुळे हिवरा आणि जनुना येथील कारवाई ही व्यापक मोहिमेची सुरुवात आहे की केवळ दाखविण्यापुरती कारवाई, याबाबतही तालुक्यात चर्चा सुरू आहे.

महसूल विभागाने सर्वच रेती घाट, नदीपात्रे आणि प्रमुख वाहतूक मार्गांवर समान पद्धतीने तपासणी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

तस्करीविरोधात मोहीम तीव्र होणार

महसूल विभागाने अवैध रेती उपसा व वाहतुकीविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, यापुढेही तालुक्यात मोठ्या प्रमाणावर तपासणी व कारवाईची मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती प्रशिक्षणार्थी उपविभागीय अधिकारी ओमकार एकाळे यांनी दिली.

सलग दोन कारवायांमुळे अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले असले, तरी फुलसांगवी, धनोडा, करंजखेड व वरुडी परिसरातील कथित रेती तस्करीवर प्रशासन कधी हातोडा चालवणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button