Uncategorized
हिमायतनगर पोलीस ठाण्यात शांतता समितीच्या बैठकीत थरार! अवैध धंद्यांचे धाबे दणाणले; पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांचा कडक इशारा, तर डॉ. गफार कार्लेकरांच्या कवितेने जिंकली मने!

हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम):
आगामी पोळा सण व श्रींच्या स्थापनेच्या पार्श्वभूमीवर हिमायतनगर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या दमदार नेतृत्वाखाली शांतता समितीची वादळी व महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी, तसेच दारू, गुटखा आणि मटका यांसारख्या अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस प्रशासनाने थेट कडक कारवाईचा धसका दिला आहे.
या बैठकीत तंटामुक्ती तालुका अध्यक्ष डॉ. गफार कार्लेकर यांनी आपल्या खास शैलीत धगधगत्या शब्दांतील कवितेतून पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या धडाकेबाज कामगिरीचे भरभरून कौतुक केले, ज्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला. या भव्य बैठकीस विविध गावांचे सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील, पोलीस अधिकारी, कर्मचारी व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.



