जनुना शाळेत शिक्षकाची तातडीने नियुक्ती करा! बदली आदेशाला १५ दिवस उलटूनही अंमलबजावणी नाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
जनुना : जि. प. प्राथमिक शाळा जनुना येथे आवश्यक शिक्षकाची तातडीने नियुक्ती करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवावे, अशी मागणी शाळा व्यवस्थापन समिती व समस्त ग्रामस्थांनी शिक्षण विभागाकडे तक्रार अर्जाद्वारे केली आहे.
शाळेतील संबंधित शिक्षिका बारतोंडे सुनिता केशवराव यांच्या बदलीचा आदेश होऊन तब्बल १५ दिवस उलटले आहेत. मात्र अद्याप या आदेशाची अंमलबजावणी झालेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या बदली आदेशाची अंमलबजावणी का होत नाही, असा सवालही ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
जनुना येथील जि. प. प्राथमिक शाळेत सुमारे दहा विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा विचार करता शाळेत आवश्यक शिक्षक उपलब्ध असणे गरजेचे आहे. बदली आदेशाच्या अंमलबजावणीला होत असलेल्या विलंबामुळे अध्यापन व्यवस्थेवर परिणाम होऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
याबाबत गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज देऊन संबंधित बदली आदेशाची तातडीने अंमलबजावणी करावी, संबंधित शिक्षिकेला कार्यमुक्त करावे आणि जनुना शाळेसाठी आवश्यक शिक्षकाची नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान तातडीने थांबविण्यासाठी प्रशासनाने दखल न घेतल्यास शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
तक्रार अर्जावर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राहुल गुणाजी नरवाडे, उपाध्यक्ष मंजुषा नामदेव खिल्लारे यांच्यासह सरपंच दत्तराव राठोड, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर कोंढवा इंगोले, सामाजिक कार्यकर्ते राजकुमार कोंडबा नरवाडे तथा समस्त ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.



