महागावात बऱ्याच वर्षापासून सुरू असलेलेअवैध गोवंश कत्तलीवर पोलिसांचा छापा; तीन गोवंश जप्त

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव : शहरात अवैधरीत्या गोवंश कत्तल केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर महागाव पोलिसांनी कारवाई करत तीन गोवंश जप्त केले. या प्रकरणी दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महागाव शहरातील पंचायत समिती कार्यालयाच्या पाठीमागे बऱ्याच वर्षापासून सुरू असलेल्या मुस्लिम कब्रस्तानच्या भिंतीलगत एका टिनशेडमध्ये सिमेंटच्या ओट्यावर गोवंश कत्तलीसाठी तयारी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पथक तयार करून सकाळी साडेपाचच्या सुमारास घटनास्थळी छापा टाकला.
या कारवाईत पोलिसांनी शेख हैदर शेख मदार कुरेशी (वय २७, रा. मदिना चौकी, वॉर्ड क्र. ६, महागाव) आणि मन्नान कुरेशी हैदर कुरेशी (वय ५०, रा. आठवडी बाजार, फुल्ट नगर, महागाव) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तीन गोवंश जप्त करण्यात आले असून, जप्त गोवंशाची अंदाजे किंमत ७५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
जप्त करण्यात आलेल्या गोवंशाला सुरक्षित ताब्यात घेऊन गोशाळेत सुपूर्द करण्याची तजवीज करण्यात आली. या प्रकरणी महागाव पोलीस ठाण्यात अप. क्र. ४५१/२०२६ अन्वये महाराष्ट्र छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० मधील कलम ११ तसेच महाराष्ट्र पशू संरक्षण अधिनियम १९७६ मधील कलम ५ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी अमर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सेवनंद वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला.



