Uncategorized

जिल्हा बँकेच्या ‘एक प्रतिनिधी’ निवडीसाठी रस्सीखेच; संस्थेच्या हितापेक्षा ‘घोडेबाजारा’ची चर्चा (भाग 6)


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रतिनिधी निवडीच्या पार्श्वभूमीवर महागाव तालुक्यातील २८ प्रतिनिधींमधून बँकेवर एक प्रतिनिधी पाठविण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. मात्र हा प्रतिनिधी नेमका संस्थेच्या आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी लढणारा असावा की केवळ सर्वांशी सलोख्याने राहून स्वतःचे राजकीय समीकरण जपणारा असावा, यावरून सहकार क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे.
बँकेतील कथित गैरव्यवहार, कर्जवाटपातील अनियमिततेचे आरोप, सुरू असलेल्या चौकशा आणि बँकेच्या आर्थिक स्थितीच्या पार्श्वभूमीवर बँकेच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करणारा आणि भ्रष्टाचाराविरोधात ठाम भूमिका घेणारा प्रतिनिधी निवडला जाणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
महागाव तालुक्यात पारंपरिक प्रभाव असलेल्या प्रतिनिधींनाच पुन्हा संधी द्यायची की तालुक्याबाहेरील सक्षम व्यक्तीला जिल्हा मध्यवर्ती बँकेवर पाठवायचे, याबाबतही मतमतांतरे आहेत. दुसरीकडे, २७ संचालकांनी आपापल्या संस्थेच्या हिताचा विचार करून स्वतंत्रपणे प्रतिनिधी निवडावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
संस्थांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष?
तालुक्यातील अनेक सहकारी संस्थांसमोर आजही स्वतःचे कार्यालय नाही, सभासदांसाठी बैठक व्यवस्था नाही, फर्निचरची कमतरता आहे, आमसभेसाठी योग्य सुविधा नाहीत, असे प्रश्न असल्याची चर्चा आहे. मात्र प्रतिनिधी निवडीच्या वेळी या प्रश्नांपेक्षा वैयक्तिक समीकरणे, मेजवान्या आणि राजकीय जुळवाजुळव यांनाच अधिक महत्त्व मिळत असल्याची कुजबुज सहकार क्षेत्रात सुरू आहे.
“पाच वर्षे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळवायची; मात्र ज्या संस्थेने मतदानाचा अधिकार दिला, त्या संस्थेच्या विकासासाठी काय केले?” हा सवाल आता सभासद आणि शेतकरी उपस्थित करू लागले आहेत.
बँकेच्या आर्थिक स्थितीवरही प्रश्न
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कारभाराबाबत यापूर्वीही विविध प्रश्न उपस्थित झाले आहेत. सध्या कथित गैरव्यवहारांच्या चौकशा सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर बँकेवर जाणारा प्रतिनिधी सहकार क्षेत्रातील प्रश्नांची जाण असलेला, शेतकऱ्यांच्या कर्जविषयक अडचणी मांडणारा आणि बँकेच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी करणारा असावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
मात्र प्रतिनिधी निवडीभोवती सुरू असलेल्या हालचालींमध्ये संस्थेच्या प्रश्नांपेक्षा वैयक्तिक हितसंबंध आणि राजकीय समीकरणांना प्राधान्य मिळत असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे २७ संचालक संस्थेचे हित, सभासदांचे प्रश्न आणि शेतकऱ्यांचे भवितव्य लक्षात घेऊन निर्णय घेणार की ‘घोडेबाजारा’च्या दबावाखाली? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
आता अंतिम क्षणी कोणाचे नाव पुढे येते आणि महागाव तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून कोणाची निवड होते, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. प्रतिनिधी निवडीनंतर संस्थेचा विचार करणारे कोण. या संपूर्ण घडामोडीचा पुढील वृत्तांत सविस्तर वाचा…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button