शहर

महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याला ४ लाखांची लाच घेताना रंगेहात पकडले


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
पुसद : महावितरणच्या पुसद विभागातील कार्यकारी अभियंत्याला चार लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी (१४ ऑगस्ट) सायंकाळी रंगेहात पकडले. जनार्दन लालू चव्हाण (वय ५७), कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, पुसद विभाग, असे कारवाई झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माहितीनुसार, तक्रारदार कंत्राटदाराला महावितरणच्या पुसद उपविभागांतर्गत ब्रेकडाऊन व मेंटेनन्सची सुमारे २० लाख रुपये किमतीची नऊ वर्क ऑर्डर देण्यात आल्या होत्या. या कामांची बिले मंजूर करून देयके मिळवून देण्यासाठी आरोपी अधिकाऱ्याने एकूण रकमेच्या २० टक्के दराने चार लाख रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती.
तक्रारीची १४ ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास पुसद येथील विद्युत भवनातील कार्यकारी अभियंत्यांच्या निवासस्थानी पडताळणी करण्यात आली. त्यावेळी चार लाख रुपयांची लाच मागणी करून ती सायंकाळी स्वीकारण्याचे मान्य केल्याचे एसीबीच्या अहवालात नमूद आहे.
त्यानंतर सायंकाळी सुमारे ७.१५ वाजता विद्युत भवनातील क्वार्टरमध्ये सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून चार लाख रुपये स्वीकारताना जनार्दन चव्हाण यांना पथकाने रंगेहात पकडले.
या प्रकरणी पुसद शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच त्यांच्या निवासस्थानी घरझडतीची कारवाई सुरू असल्याची माहिती एसीबीने दिली.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावतीचे पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक संजय शिंदे असून पर्यवेक्षण पोलीस उपअधीक्षक राजेश राठोड यांनी केले. पथकात पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले, पोलीस निरीक्षक रविंद्र सहारे, पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांच्यासह पोलीस अंमलदार सहभागी होते.
महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर झालेल्या या कारवाईमुळे पुसद विभागातील कंत्राटी कामे, बिल मंजुरी आणि देयक प्रक्रियेबाबतही आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. घरझडतीत काय आढळते आणि तपासात आणखी कोणती माहिती समोर येते, याकडे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button