लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे सवना-वाकोडी रस्त्याचे काम रखडले; नागरिकांमध्ये संताप पाच वर्षांपासून काम अपूर्ण, पावसात चिखलातून वाट काढण्याची वेळ; ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील सवना ते वाकोडी रस्त्याचे काम गेल्या पाच वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. नुकत्याच झालेल्या पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रस्त्याच्या कामावर मोठा खर्च करण्यात आला असला तरी अद्यापही काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे सवना व वाकोडी परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. लोकप्रतिनिधींनी या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यामुळे संबंधित ठेकेदारांचे मनोबल वाढल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.
दरम्यान, गुंज-माळकिनी पुलाचे कामही अद्याप अधुरे असून अनेकदा ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने पावसाळ्यात या परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. अपूर्ण पुलामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला असून नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे.
“या परिस्थितीला जबाबदार कोण?” असा सवाल मतदारसंघातील नागरिक उपस्थित करीत आहेत. विकासकामांच्या नावाखाली निधी खर्च होत असताना प्रत्यक्षात कामे वेळेत पूर्ण होत नसल्याने लोकप्रतिनिधी व प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.



