आंबोडा येथे विनारॉयल्टी मुरूम उत्खननाचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह टेकडी खोदून रस्त्यावरील खड्डे बुजवल्याचा दावा, ग्रामस्थांकडून चौकशीची मागणी

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील आंबोडा येथे शासनाची रॉयल्टी न भरता मुरूम उत्खनन करून रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. या प्रकारामुळे महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, पावसाळ्याचा फायदा घेत टेकडीमधून जेसीबीच्या साह्याने मोठ्या प्रमाणात मुरूम काढण्यात आला आणि तो रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वापरण्यात आला. मात्र, या उत्खननासाठी आवश्यक असलेली रॉयल्टी भरल्याची कोणतीही माहिती समोर आलेली नसल्याचा दावा करण्यात येत आहे.
ग्रामस्थांनी असा आरोप केला आहे की, सरपंच पद रिक्त असताना ग्रामसेवकांच्या देखरेखीखाली हे काम करण्यात आले. तसेच, संबंधित पटवारी व मंडळ अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई न केल्याने प्रशासन झोपेचे सोंग घेत असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे.
“विनारॉयल्टी मुरूम उत्खनन करून शासनाच्या नियमांचे उल्लंघन झाले असल्यास संबंधितांकडून रॉयल्टी वसूल करण्यात यावी. तसेच कोणत्या आधारावर या कामाचे शासकीय बिल काढले जाणार?” असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.



