“शिवरायांच्या पुतळ्यासमोरील पेट्रोल पंप हटवा!” — विशेष सभेत सत्ताधाऱ्यांची कोंडी, विरोधकांचा ठाम पाठींबा

उमरखेड वार्ता मुख्य संपादक
उमरखेड | दि. 30 मे
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरील पेट्रोल पंप हटवण्याच्या मागणीवरून आज दुपारी 3 वाजता घेण्यात आलेली विशेष सभा चांगलीच गाजली. या सभेत सत्ताधाऱ्यांवर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल करत प्रशासनाची निष्क्रियता उघडकीस आणली.
सभेची सुरुवात होताच नगरसेविका रुपाली सुधीर कवाने यांनी निवडणुकीत जनतेला दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली. “सत्तेत आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा पूर्ण करून देऊ,” असे वचन जनशक्ती पॅनेलने दिले होते. त्या वचनपूर्तीसाठीच ही विशेष सभा बोलावल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मात्र, यावर नगरसेवक सुरेंद्र कोडगीरवार यांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. “मागील 29 जानेवारीच्या सभेनंतर कोणताही ठोस पाठपुरावा झाला नाही, त्यामुळे 90 दिवसांनी पुन्हा त्याच विषयावर सभा घ्यावी लागते, ही सत्ताधाऱ्यांची राजकीय हार आहे का?” असा खोचक सवाल त्यांनी उपस्थित केला. या प्रश्नामुळे सभागृहात एकच खळबळ उडाली.
दरम्यान, शिक्षण सभापती यांनी पीठासन अधिकाऱ्यांची परवानगी न घेता उत्तर देण्याचा प्रयत्न केल्याने गोंधळ निर्माण झाला. त्यांच्या या भूमिकेला स्वीकृत नगरसेवक बाळासाहेब नाईक यांनी पाठिंबा दिल्याने वातावरण आणखी तापले.
विरोधकांचा स्पष्ट इशारा:
सभेत विरोधकांनी स्पष्ट भूमिका घेतली की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरील सुशोभीकरणात अडथळा ठरणारा सारडा पेट्रोल पंप तात्काळ हटवण्यात यावा. “या प्रश्नावर आम्ही पूर्णपणे तुमच्या सोबत आहोत, पण आता केवळ आश्वासन नको — ठोस निर्णय घ्या,” असा इशारा त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिला.
एकूणच, आजची सभा ही केवळ चर्चा न राहता सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी ठरली असून, आता पेट्रोल पंप हटवण्याबाबत प्रशासन काय निर्णय घेते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.



