महागाव पंचायत समितीचा वादग्रस्त कनिष्ठ अभियंता सलामे — बदली, निलंबनाची कारवाई कधी?

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव : महागाव पंचायत समितीतील कनिष्ठ बांधकाम अभियंता प्रवीण सलामे यांच्याभोवतीचा वाद दिवसेंदिवस वाढत असून त्यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. विविध कामांतील अनियमितता, कार्यालयामध्ये दारू पिणे,कामकाजातील ढिलाई आणि तक्रारींचा भडिमार होत असतानाही त्यांच्यावर निलंबनाची कारवाई न करता केवळ प्रशासकीय बदली करण्यात आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सलामे यांनी विविध कामांमध्ये नियमबाह्य पद्धतीने कारभार केल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. प्रत्यक्ष काम न करता कामांचे मूल्यमापन करणे तसेच बांधकामाशी संबंधित अतिरिक्त प्रभार गटविकास अधिकाऱ्यांनी पत्राद्वारे त्यांच्या स्वाधीन केल्यामुळे संबंधित ग्रामपंचायतींमध्येही प्रश्न निर्माण झाले आहेत. काही ठिकाणी कामांचा दर्जा खालावल्याच्या तक्रारी असून, यामुळे शासनाच्या निधीचा अपव्यय होत असल्याचेही बोलले जात आहे.
याशिवाय, पंचायत समितीच्या बांधकाम विभागात सलामे वारंवार अनुपस्थित राहत असल्याचे निदर्शनास आले आहे. या सर्व बाबींचा सविस्तर अहवाल तयार करून गटविकास अधिकारी दत्तात्रय कदम यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पाटील यांच्याकडे सादर केला होता. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती.
मात्र, जिल्हा परिषद प्रशासनाने निलंबनाऐवजी केवळ बदलीचा आदेश काढल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. भ्रष्टाचाराच्या तक्रारी, कामकाजातील त्रुटी उघड झाल्यानंतरही निलंबनाची कारवाई का झाली नाही, असा सवाल महागाव तालुक्यातील नागरिक उपस्थित करत आहेत. काही जणांच्या मते संबंधित अधिकाऱ्याला वाचविण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा देखील रंगू लागली आहे.
दरम्यान, या प्रकरणात पारदर्शक चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. स्थानिक नागरिक व प्रतिनिधींनी प्रशासनाने या गंभीर प्रकरणाकडे दुर्लक्ष न करता योग्य ती पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली



