९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कविकट्ट्यासाठी कारंजा (लाड) येथील ज्येष्ठ साहित्यिका ॲड. मंगलाताई नागरे यांच्या कवितेची निवड

प्रतिनिधी संजय नागरगोजे
महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा स्वागताध्यक्ष मा. ना. शिवेंद्रराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सातारा या ऐतिहासिक नगरीत होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील कविकट्ट्यासाठी कारंजा (लाड) येथील ज्येष्ठ व सुप्रसिद्ध साहित्यिका ॲड. सौ. मंगलाताई नागरे यांच्या कवितेची निवड करण्यात आली आहे.
साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुळकर्णी, कविकट्टा प्रमुख राजन लाखे तसेच समन्वयक सविता कारंजकर यांच्या वतीने ॲड. मंगलाताई नागरे यांना विशेष निमंत्रित म्हणून आमंत्रित करण्यात आले असून, त्यांचे काव्यवाचन उद्या दिनांक ०३ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या कविकट्ट्यात होणार आहे.
या उल्लेखनीय यशामुळे कारंजा (लाड) येथील साहित्यक्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे, असे मत ज्ञानगंगा साहित्य मंडळ, कारंजाचे अध्यक्ष तसेच ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी व्यक्त केले आहे.
ॲड. मंगलाताई नागरे यांच्या या निवडीबद्दल साहित्यिक, सामाजिक, शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रांतून त्यांच्यावर अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



