पुसद भाजपची घसरण : जिल्हाध्यक्ष आरती फुपाटेंची “उलटी कामगिरी” दहा नगरसेवकांवरून थेट पाचांवर; पक्ष भुईसपाट, जबाबदार कोण?

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
पुसद शहरात भारतीय जनता पार्टीला मिळालेला दारुण पराभव हा अपघात नसून, तो नेतृत्वाच्या अपयशाचा जिवंत पुरावा असल्याची तीव्र चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. नुकतेच भाजपकडून आरती फुपाटे यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली; मात्र त्यांच्या नेतृत्वाखाली पुसदमध्ये भाजप दहा नगरसेवकांवरून थेट पाच नगरसेवकांवर येऊन कोसळली. याला मोठी “कामगिरी” म्हणायची का, असा खोचक सवाल उपस्थित होत आहे.
नेहमी पक्ष बदलत राहणाऱ्या आरती फुपाटेंना भाजपने जिल्हाध्यक्षपद दिले; परंतु त्यांच्या नियुक्तीनंतरच पुसद शहरात भाजपची पूर्णपणे भुईसपाट अवस्था दिसून आली. एवढेच नव्हे, तर माजी आमदार आणि माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांची कामगिरीही या निवडणुकीत पूर्णतः अकार्यक्षम ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुसद मतदारसंघातील राजकारणात “किंगमेकर” म्हणून ओळखले जाणारे मनोहररावजी नाईक यांच्या आशीर्वादाशिवाय येथे कोणताही नेता मोठा होऊ शकत नाही, हे वास्तव सर्वश्रुत आहे. अनेक नेत्यांनी नाईक यांच्या आशीर्वादानेच मोठी पदे पदरात पाडून घेतली, हे जनतेला माहीत आहे.
याच पार्श्वभूमीवर, यावेळी माजी .मंत्री मनोहर रावजी नाईक यांचा आशीर्वाद राज्यमंत्री इंद्रनील नाईक व मोहनी ताई यांच्या पाठीशी असल्यामुळे मोहिनी ताई यांचा दणदणीत विजय झाला आणि बहुमतही प्राप्त झाले. हा विजय म्हणजे मनोहरराव नाईक यांच्या राजकीय ताकदीची पावती असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, पुसदमध्ये सुरू असलेल्या राजकीय घडामोडींकडे नागरिकांचे लक्ष वेधले गेले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेतृत्व करणारे शरद मैंद यांना केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले. “बंगल्याच्या विरोधात” विधानसभेला उभे राहून त्यांनी आपले संपूर्ण राजकीय अस्तित्वच पणाला लावल्याचे चित्र दिसून आले.
या सगळ्या राजकीय उलथापालथीत, आरती फुपाटे यांनी भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांची अक्षरशः ‘वाट लावल्याचे’ चित्र पुसद शहरात दिसून येत आहे. पक्षातील अंतर्गत गटबाजी, समन्वयाचा अभाव आणि नेतृत्वाचा गोंधळ यामुळे कार्यकर्ते एकत्र उभे राहू शकले नाहीत.
जर संपूर्ण कार्यकर्ते एकदिलाने, युती करून उभे राहिले असते, तर भाजपवर ही नामुष्कीची वेळ आली नसती, अशी खंत कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. त्यामुळे आता पुसद शहरात एकच प्रश्न चर्चेत आहे —
या पराभवाला नेमके जबाबदार कोण? नेतृत्व की व्यवस्थापन, की अंतर्गत राजकारण?
या प्रश्नाचे उत्तर लवकरच मिळणार की, पक्ष पुन्हा एकदा “पुढच्या वेळेला पाहू” म्हणत विषय दाबणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



