नवी मुंबईकरांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज पहिल्या प्रवासी विमानाचे यशस्वी लँडिंग झाले.

आज दिवसभरात १५ विमानांचे टेक ऑफ आणि १५ विमानांचे यशस्वी लँडिंग करण्यात आले. तर आज पहिल्या दिवशी ४ हजार प्रवाशांनी या विमानतळावरून प्रवास केला. त्यामुळे हे विमानतळ खऱ्या अर्थाने देशवासीयांच्या सेवेत दाखल झाले असल्याचे मत शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे यांनी समाज माध्यमांवर व्यक्त केले. मुंबईकरांचा देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवास आता अधिक जलदगतीने होणे शक्य होणार आहे असेही त्यांनी नमूद केले आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणजे या नवनगराला विकासाकडे घेऊन जाणारा एक गेमचेंजर प्रकल्प असून त्यामुळे हे शहर आता जगाच्या नकाशावर ओळखले जाणार आहे. या विमानतळाला रस्ते, रेल्वे, मेट्रो मार्गाने आणि जलमार्गानेही जोडण्याचा आमचा प्रयत्न असून भविष्यात मुंबई आणि नवी मुंबई ही दोन्ही विमानतळं एकमेकांना थेट रस्त्याने जोडून हे अंतर कमी करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन एकनाथ शिंदे यांनी केले.
नवी मुंबई विमानतळाचे हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवल्याबद्दल त्यांनी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह, केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री राममोहन नायडू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सिडको प्राधिकरण आणि अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेड यांचे मनापासून आभार मानले.



