पहिल्याच पावसात उंबरखेड–पुसद मार्ग ठप्प; पुलाच्या संथ कामामुळे नागरिकांमध्ये संताप मुदतीत काम पूर्ण झाले असते तर ही वेळ आली नसती; ठेकेदारावर कारवाईची मागणी

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
पहिल्याच दमदार पावसात उमरखेड ते पुसद हा महत्त्वाचा मार्ग काही काळासाठी बंद पडल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. पुलाचे काम संथ गतीने सुरू असल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित ठेकेदाराने पुलाचे काम मुदतीत पूर्ण केले असते, तर आज ही वेळ आली नसती. या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. मात्र, पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला असून अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
लोकप्रतिनिधींनी अशा विकासकामांकडे गांभीर्याने लक्ष का दिले नाही, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. अपूर्ण कामामुळे सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, पुलावरून पाण्याचा प्रवाह सुरू असताना नागरिकांनी जीव धोक्यात घालून प्रवास करू नये, असे आवाहनही स्थानिकांकडून करण्यात आले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने काही काळ वाहतूक बंद ठेवण्यात आल्याचे समजते.
संबंधित ठेकेदाराला कडक इशारा देऊन युद्धपातळीवर काम पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत, तसेच विलंबास जबाबदार असलेल्या घटकांवर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.



