Uncategorized

पेट्रोल पंपाच्या अतिक्रमणावर प्रशासनाची टोलवाटोलवी; एका पेट्रोल पंप चालकापुढे संपूर्ण यंत्रणा हतबल?

उमरखेड, दि. २९ :
छत्रपती शिवाजी महाराज स्मारकालगत असलेल्या कथित अतिक्रमणग्रस्त पेट्रोल पंपाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना प्रशासन मात्र केवळ कागदोपत्री हालचाली करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. एका पेट्रोल पंप चालकाविरुद्ध प्रत्यक्ष कारवाई करण्याचे धाडस प्रशासन दाखवत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

जिजाऊ ब्रिगेडच्या कार्याध्यक्ष सरोज देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराज स्मारकावरील अतिक्रमण हटवून स्मारकाचे सुशोभीकरण करण्याच्या मागणीसाठी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला चौथा दिवस उलटूनही प्रशासनाकडून ठोस निर्णय झालेला नाही. उपविभागीय अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग एकमेकांकडे जबाबदारी ढकलत असल्याने प्रशासनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

प्रश्न असा निर्माण होत आहे की, जर सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिक्रमणाबाबत अहवाल दिला असेल, तर प्रत्यक्ष कारवाईला विलंब का? एका पेट्रोल पंप चालकावर कायद्याप्रमाणे कारवाई करण्यास प्रशासनाला कोणाचा दबाव आहे का? की संपूर्ण यंत्रणा एका प्रभावशाली व्यक्तीसमोर हतबल झाली आहे?

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा सन्मान राखण्यासाठी अतिक्रमण तातडीने हटविणे ही प्रशासनाची कायदेशीर आणि नैतिक जबाबदारी आहे. केवळ पत्रव्यवहार, बैठका आणि आश्वासने देऊन हा विषय संपणार नाही. कायदा सर्वांसाठी समान असेल तर अतिक्रमण करणाऱ्यावरही तो तितक्याच कठोरपणे लागू झाला पाहिजे.

सरोज देशमुख यांनी उपोषणातून केलेल्या मागण्यांना आमचा जाहीर पाठिंबा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावरील कथित अतिक्रमण तात्काळ हटवून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी नागरिकांची ठाम मागणी आहे.

जोपर्यंत प्रत्यक्ष कारवाई सुरू होत नाही, तोपर्यंत प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह कायम राहील. आता जनतेला आश्वासने नव्हे, तर अतिक्रमण हटविण्याची प्रत्यक्ष कृती अपेक्षित आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button