निवडणूकीचे मैदान सज्ज कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक : विविध राजकीय पक्षांच्या दोन पॅनलमध्ये होणार घमासान

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
उमरखेड : मागील एक वर्षापासून प्रशासक्रात सुरू असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक दि 31 मे रोजी पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज दि 21 मे रोजी विड्रॉलनंतर उमेदवार निश्चित झाले असल्याने भाजपाच्या नेतृत्वाखालील आघाडी व विरोधातील काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडी निवडणूक लढविण्यासाठी सज्ज झाली आहे. उमेदवारांच्या प्रचारासाठी केवळ आठ दिवस शिल्लक राहिल्याने दोन्ही पॅनल दिवसरात्र एक करून आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावणार आहेत.
दि. 6 जून 2024 पासून तब्बल एक वर्षापासून प्रशासकराज सुरु होते. भाजपाच्या नेतृत्वातील वसंतराव नाईक शेतकरी विकास आघाडी प्रणित पॅनल मध्ये राष्ट्रवादी अजित पवार या गटांचे काही उमेदवार सहभागी झाले आहेत तर काँग्रेसच्या नेतृत्वातील शेतकरी सहकारी विकास पॅनल मध्ये शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी शरद पवार व शिवसेना शिंदे गट सहभागी झाले आहेत उद्या दि 22 मे रोजी चिन्ह वाटपानंतर आपापल्या पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभहोणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती ही तालुक्यातील शेतकऱ्यांची सधन सहकारी संस्था म्हणून ओळखली जात असल्याने सहकार क्षेत्रात वर्चस्व असलेल्या राजकीय पक्षनेतृत्वांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. भाजपाचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा, विद्यमान आमदार किसनराव वानखेडे, नव्यानेच भाजपात प्रवेश घेतलेले माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर , माजी आमदार विजयराव खडसे, तर शेतकरी सहकारी विकास पॅनल च्या वतीने तातू देशमुख, राम देवसरकर, नंदकिशोर अग्रवाल साहेबराव कांबळे दत्तराव शिंदे , उबाठाचे अॅड बळीराम मुटकुळे सतीश नाईक, शिंदे शिवसेनेचे चितांगराव कदम, प्रवीण मिराशे, रविकांत रुडे आदी सहकार क्षेत्रातील दिग्गज प्रचाराची धुरा सांभाळणार आहेत .
चौकट
18 जागांसाठी निवडणूक
या निवडणूकीत सर्वसाधारण राखीव करिता सात जागा, महिला राखीव दोन, इतर मागासवर्गीयासाठी एक, विमुक्त जाती मतदारसंघासाठी एक, आर्थिक दुर्बल घटकासाठी एक, व्यापारी आरती मतदारसंघासाठी दोन जागा, हमाल मापारी तोलारी मतदारसंघासाठी एक जागा अशा एकुण ’18 जागांसाठी ही निवडणूक होत आहे.
४० उमेदवार रिंगणात
आज उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकुण 164 पैकी 124 जणांनी माघार घेतली त्यामुळे एकूण 40 उमेदवार रिंगणात आहेत.