शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा बैलगाडीतून वाजत गाजत प्रवेश!

“उच्च प्राथमिक मराठी शाळा राहुर आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या समन्वयातून अनोखा उपक्रम”
महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यांत आज शाळेच्या पहिल्या दिवशी राहुर येथील ग्रामपंचायत पदाधिकारी आणि मल्हार आर्मी सेनेच्या वतीने आगळावेगळा उपक्रम राबवीत जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या प्रवेश निश्चितीसाठी ग्रामस्थांना प्रोत्साहित करण्यात आले.
दिं. 23 जून 2025 रोजी विदर्भामध्ये सर्वत्र शाळेचा पहिला दिवस, पहिली घंटी वाजली. या मध्ये जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा राहुर (केंद्र- फुलसांगवी) या शाळेमध्ये इयत्ता पहिली मध्ये नव्याने प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या गावातील सर्व पालकांनी आपल्या पाल्यांचा मराठी शाळेतच प्रवेश निश्चित करावा. या संकल्पनेतून राहुर ग्रामपंचायत पदाधिकारी आणि मल्हार आर्मी सेनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव काळे पाटील यांच्या समन्वयातून ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांना चक्क सजावट केलेल्या बैलगाडीतून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत पोहोचून पुष्पगुच्छ देत आपल्या मराठी शाळेतच उत्कृष्ट शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित केले. महाराष्ट्र शासन शालेय व क्रीडा विभागाच्या वतीने 2025/26 या शालेय सत्राची सुरुवात 23 जून रोजी शाळेच्या पहिल्या दिवसा पासून सुरुवात झाली. जिल्हा परिषद शाळेमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांनंसाठी शिष्यवृत्ती योजना, सर्वांसाठी मध्यान्ह भोजन व्यवस्था, मोफत पाठ्यपुस्तक, मोफत शालेय गणवेश वाटप उपक्रमा सोबतच नियमित आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्याचा शासनाने उपक्रम हाती घेतला आहे. ‘चला मराठी शाळेत जाऊया, आनंददायी गुणवत्तापूर्ण राष्ट्रीय शिक्षण घेऊया’असे नारे देत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा राहुर येथे पहिली वर्गात प्रवेश निश्चित करण्यासाठी आलेल्यामुलांचे या वेळी सरपंच, उपसरपंच आणि मल्हार आर्मी सेनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव काळे पाटील यांनी पुष्पगुच्छ देत चिमुकल्यांचे स्वागत केले आहे. राहुर गावातून सजवलेल्या बैलगाडीतून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वाजत गाजत शाळेत आणून प्रवेश घेण्याच्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमांमुळे मल्हार आर्मीचे जिल्हाध्यक्ष, गावकरी, ग्रामपंचायत पदाधिकारी, तसेच शिक्षक वृंदाचा हा उपक्रम निश्चितच इतर शाळांना प्रेरणा देणारा ठरणार आहे, एवढे मात्र खरे!