पाच वर्षांपासून फरार असलेला वीज कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यातील आरोपी अखेर जेरबंद!

विडूळ येथून लखन उगलकरला अटक; उमरखेड पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाची उल्लेखनीय कामगिरी
उमरखेड तालुक्यातील विडूळ येथील विद्युत उपकेंद्रात कर्तव्य बजावत असताना महावितरणच्या सहाय्यक अभियंता व लाईनमन यांच्यावर हल्ला करून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याच्या प्रकरणात गेल्या पाच वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अखेर उमरखेड पोलिसांच्या डी.बी. पथकाने जेरबंद केले आहे. लखन हरिदास उगलकर (वय ३५, रा. विडूळ, ता. उमरखेड, जि. यवतमाळ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली.
नेमकी घटना काय?
दिनांक ३० सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास महावितरणचे सहाय्यक अभियंता भास्कर मनोहर नैताम आणि त्यांचे लाईनमन विडूळ येथील विद्युत उपकेंद्रात वीजवाहिनी दुरुस्तीचे काम करीत होते. यावेळी लखन हरिदास उगलकर व त्याच्या अन्य दोन साथीदारांनी संगनमत करून त्यांच्यावर हल्ला केला. या घटनेत सहाय्यक अभियंता व लाईनमन जखमी झाल्याचे तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते.
या प्रकरणी उमरखेड पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ५११/२०२१, भारतीय दंड विधान कलम ३५३ व इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, गुन्हा दाखल झाल्यापासून लखन उगलकर हा फरार होता.
गोपनीय माहितीच्या आधारे सापळा
जिल्ह्यातील पाहिजे व फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत उमरखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथक फरार आरोपींचा शोध घेत होते.
दरम्यान, गोपनीय माहितीगारांकडून मिळालेली माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे लखन उगलकर हा विडूळ येथे असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ सापळा रचून त्याला विडूळ गावातून शिताफीने ताब्यात घेतले आणि संबंधित गुन्ह्यात अटक केली.
पाच वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीला अखेर अटक करण्यात आल्याने उमरखेड पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाच्या कामगिरीचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, अपर पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी गौरव कायंदेपाटील आणि उमरखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक अमोल गुंडे, डी.बी. पथकप्रमुख पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे, सहायक फौजदार दिलीप चव्हाण, पोलीस हवालदार चंदन जाधव, पोलीस हवालदार ढाकरे, पोलीस कॉन्स्टेबल संघशील टेंभरे, दिगांबर गिते, विष्णू राठोड, नितेश लांडे तसेच चालक पोलीस कॉन्स्टेबल राजीव मेटकर यांनी सहभाग घेतला.
फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मोहिमेत उमरखेड पोलिसांनी केलेली ही कारवाई उल्लेखनीय ठरली आहे.



