Uncategorized

समाजाच्या जिवावर मोठे झालेल्या नेत्यांनी बंजारा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करावी’ विद्रोही शेतकरी नेते मनीष जाधव यांचा घणाघाती आरोप; ‘आता राहू नका बेकीने, वागू एकीने’


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
“बंजारा समाजाच्या जिवावर मोठे झालेले अनेक नेते आज सत्तेच्या खुर्च्यांवर विराजमान आहेत. मात्र समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर त्यांची भूमिका काय आहे, हे त्यांनी स्पष्ट करावे,” असा घणाघाती आरोप विद्रोही शेतकरी नेते मनीष जाधव यांनी केला.
बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी वागद इजारा येथे आयोजित गोर शिकवाडी मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी प्रथमच आरक्षणाच्या प्रश्नावर समाजाची भूमिका मांडत राजकीय नेत्यांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
बंजारा समाजाकडून आरक्षणाच्या मागणीसाठी रास्ता रोको, अन्नत्याग, आमरण उपोषण, धरणे, साखळी उपोषण तसेच विराट मोर्चांच्या माध्यमातून लोकशाही मार्गाने सातत्याने आंदोलने करण्यात आली आहेत. मात्र शासनाकडून केवळ आश्वासने मिळत असून प्रत्यक्ष निर्णय होत नसल्याचा आरोप जाधव यांनी केला.
‘समितीचा अहवाल येणार’च्या पलीकडे ठोस निर्णय हवा
“आरक्षणाच्या नावावर अनेक नेते या समाजाच्या पाठिंब्यावर खासदार, आमदार झाले. काही जण आज सत्तेत मंत्रीपदही भोगत आहेत. मात्र आरक्षणाचा प्रश्न उपस्थित झाला की ‘समितीचा अभ्यास सुरू आहे, अहवाल येणार आहे’ एवढेच सांगितले जाते. आता आश्वासन नको, कृतीतून निर्णय हवा,” अशी भूमिका जाधव यांनी मांडली.
सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या समाज मागासलेला असल्याचा दावा करत बेरोजगारी वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. रोजगाराच्या अभावामुळे समाजातील अनेक कुटुंबांना उदरनिर्वाहासाठी स्थलांतर व भटकंती करावी लागत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
‘राजकीय तडजोडी नकोत; समाजाला ठोस निर्णय हवा’
बंजारा समाजाच्या न्याय, हक्क, अधिकार, अस्मिता आणि अस्तित्वाच्या प्रश्नावर आता प्रासंगिक राजकीय तडजोडी स्वीकारल्या जाणार नाहीत. समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर समाजनेत्यांनी आपल्या पक्षश्रेष्ठींकडे ठाम भूमिका मांडावी, असे आवाहन जाधव यांनी केले.
“केवळ सत्तेत राहण्यासाठी समाजाचा वापर करणाऱ्या नेत्यांच्या मागे समाज यापुढे उभा राहीलच असे नाही. निवडणुकीच्या वेळी समाज अशा नेत्यांचा जाब घेईल,” असा इशाराही त्यांनी दिला.
काही राजकीय पक्षांकडून बंजारा समाजाला विशिष्ट पक्षाच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत, समाजाच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये इतर राजकीय नेत्यांनी अनावश्यक हस्तक्षेप करू नये, असेही त्यांनी सांगितले.
‘नेता समाज ठरवेल’
पक्षश्रेष्ठींनी एखाद्या व्यक्तीला समाजाचा नेता म्हणून घोषित करण्याची आवश्यकता नाही. समाजाचा नेता कोण, हे समाजच ठरवेल, अशी स्पष्ट भूमिका जाधव यांनी मांडली.
आरक्षण मिळाले नाही तर राजीनामा देण्याचे आश्वासन देणाऱ्या समाजनेत्यांचा शोध आगामी निवडणुकीत समाज घेईल, असेही त्यांनी म्हटले.
पाच हजार ग्रामपंचायतींचे ठराव घेण्याचे अभियान
गोर सेनेच्या माध्यमातून राज्यातील सुमारे पाच हजार ग्रामपंचायतींमध्ये तांडा-तांड्यावर जाऊन ग्रामपंचायत ठराव घेऊन शासनाकडे बंजारा आरक्षणाची मागणी करण्याचे अभियान हाती घेण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
आरक्षणासाठी समाजाने संघर्षाची तयारी ठेवावी. राजकीय हस्तक्षेपापासून दूर राहून कायद्याची जाण असलेले, लोकशाहीच्या रचनात्मक मार्गाने लढा देणारे, अभ्यासू आणि निष्कलंक नेतृत्व समाजाने पुढे आणावे. अशा नेतृत्वाच्या पाठीशी समाजाने एकजुटीने उभे राहून आरक्षणाचा लढा अधिक तीव्र करावा, असे आवाहन जाधव यांनी केले.
यावेळी ग्रामपंचायत ठरावाचा मसुदा समाजबांधवांना देण्यात आला. उपस्थितांनी आरक्षणाच्या लढ्यात सक्रिय सहभाग घेण्याचा संकल्प केला.
‘राहू नका बेकीने, आता वागू एकीने’
कार्यक्रमात ‘राहू नका बेकीने, आता वागू एकीने’ आणि ‘मांगने से भीक मिलती है, अधिकार नहीं’ अशा घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. संत सेवालाल महाराज, वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक यांच्या जयघोषाने कार्यक्रमाची सांगता झाली.
यावेळी वाशिम जिल्ह्यातून गोर सेनेचे मार्गदर्शक प्रा. राजू चव्हाण, ह.भ.प. कैलास महाराज पुजारी, सेवानिवृत्त शिक्षक विष्णू राठोड, अशोक धर्मा जाधव, रामरतन राठोड, साहित्यिक तथा पत्रकार प्रल्हाद राठोड कारभारी, काशीराम जाधव, अशोक पवार, रमेश राठोड, संजय जाधव, तुकाराम राठोड कारभारी, विजय जाधव, वासुदेव राठोड, भिकन राठोड, देवराव राठोड यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button