शासन फूट पाडण्याचा प्रयत्न करेल; संघटित राहा, हक्क मिळेपर्यंत संघर्ष करा’ आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटना व विदर्भ राज्य आंदोलन समितीचा पाठिंबा

यवतमाळ : प्रतिनिधी संजय नागरगोजे
“सत्ताधारी शासन आंदोलनकर्त्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करू शकते. त्यामुळे त्यांचे डाव वेळीच ओळखा, संघटित राहा आणि अधिकार, न्याय व हक्क मिळेपर्यंत संघर्ष करा,” असे आवाहन शेतकरी नेते मनीष जाधव यांनी केले.
यवतमाळ जिल्हा परिषद कार्यालयासमोर आदिवासी विद्यार्थ्यांकडून सुरू असलेल्या साखळी उपोषणस्थळी विद्यार्थ्यांची भेट घेऊन मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत समर्थनपत्र देण्यात आले.
राज्यभरात आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा संदर्भ देताना जाधव म्हणाले की, आपल्या हक्क आणि अधिकारांसाठी वेळप्रसंगी संघर्ष करावा लागतो. शोषणमुक्त व्यवस्थेसाठी सुरू असलेल्या या आंदोलनातील विद्यार्थ्यांची ऐतिहासिक एकजूट ही प्रस्थापित व्यवस्थेला दिलेली चपराक असल्याचे त्यांनी सांगितले.
आंदोलनातील एकजुटीला तडा देण्याचा प्रयत्न होऊ शकतो, असा दावा करत विद्यार्थ्यांनी सावध राहण्याचे आवाहन त्यांनी केले. “एकजूट कायम ठेवा आणि फूट पाडण्याचे प्रयत्न हाणून पाडा,” असेही ते म्हणाले.
‘आदिवासी विकास मंत्र्यांचे हे अपयश’
आदिवासी विद्यार्थ्यांना त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी रस्त्यावर उतरावे लागत असल्याबद्दल जाधव यांनी आदिवासी विकास मंत्री अशोकराव उईके यांच्यावरही टीका केली.
“यवतमाळ जिल्ह्यात आदिवासी विकास मंत्री असतानाही आदिवासी विद्यार्थ्यांना आपल्या न्याय्य मागण्यांसाठी संघर्ष करावा लागतो, हे मंत्र्यांचे अपयश आहे,” अशी टीका त्यांनी केली.
राज्यातील काही आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या समस्या गंभीर असल्याचा आरोप करत त्यांनी आश्रमशाळांच्या व्यवस्थेबाबतही प्रश्न उपस्थित केले. विविध कारणांनी विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागल्याच्या घटनांची नैतिक जबाबदारी स्वीकारून मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
नऊपैकी पाच मागण्या मान्य; उर्वरित मागण्यांचा तातडीने निर्णय घ्या
आदिवासी विद्यार्थ्यांनी शासनाकडे नऊ प्रमुख मागण्या मांडल्या असून, त्यापैकी केवळ पाच मागण्या मान्य झाल्याचा दावा जाधव यांनी केला. उर्वरित मागण्यांवरही शासनाने तातडीने निर्णय घ्यावा आणि मुख्यमंत्री यांनी स्वतः या प्रश्नाची दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
“मागणी केल्याने भीक मिळते, अधिकार मिळत नाहीत; अधिकारांसाठी संघर्ष करावा लागतो,” असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भविष्यातही पाठिंबा देण्याचे स्पष्ट केले. मागण्यांची दखल न घेतल्यास विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
आंदोलनाला संघटनांचा पाठिंबा
यावेळी शेतकरी नेते मनीष जाधव यांनी उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची आस्थेने भेट घेऊन त्यांच्या मागण्यांबाबत चर्चा केली. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि विदर्भ राज्य आंदोलन समितीने आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत समर्थनपत्र दिले.
यावेळी मा. योगेश भाऊ मडावी, मधुकर भाऊ टेकाम, समीर, शुभम जयस्वाल, विशाल पवार, प्रवीण पवार यांच्यासह विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



