शहर

हिमायतनगरच्या मुख्य रस्त्यावर रात्री मोकाट जनावरांचा ठिय्या; वाहनांचे हॉर्न वाजवूनही जनावरे हलेनात, टू-व्हीलर चालकांचा जीव धोक्यात अन् भीषण अपघाताची दाट शक्यता!


​हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम):
हिमायतनगर शहरातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर (किनवट-नांदेड मार्ग) रात्रीच्या वेळी रस्त्याच्या मधोमध ठिय्या मांडून बसणाऱ्या मोकाट जनावरांमुळे गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांनी कितीही मोठ्याने हॉर्न वाजवला, तरीही ही जनावरे रस्त्यावरून ढिम्म हलत नाहीत. या मोकाट जनावरांमुळे विशेषतः टू-व्हीलर चालकांचा जीव टांगणीला लागला असून मोठा अपघात होण्याचे चांसेस वाढले आहेत.
​रात्रीच्या अंधारात किंवा वाहनाचा लाईट कमी असल्यास रस्त्यात बसलेली ही जनावरे वेळेवर दिसून येत नाहीत. अशा वेळी अचानक जनावर समोर आल्यास टू-व्हीलर घसरून भीषण अपघात घडण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
​दुसरीकडे, अचानक जनावर आडवे आल्याने धडक बसून अनुचित घटना घडल्यास, निष्पाप वाहनधारकांना नाहक कायदेशीर व सामाजिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्वतःचा कोणताही दोष नसताना चालकांवर ही आफत येत असल्याने वाहनधारकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
​अनेक पशुपालक रात्रीच्या वेळी आपल्या जनावरांना रस्त्यावर मोकाट सोडून देत आहेत. अशा बेजबाबदार पशुपालकांवर नगर पंचायतीकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने मुख्य रस्त्यावर अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
​प्रशासन व नगर पंचायतीने या मोकाट जनावरांचा तातडीने योग्य बंदोबस्त करावा आणि हॉर्न वाजवूनही न हटणाऱ्या जनावरांच्या मालकांवर नियमानुसार कडक कारवाई करून वाहनधारकांना सुरक्षित रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी जोरदार मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button