Uncategorized

सीमेवर देशाची राखण करणारा राजू आता वडिलांचा आधारवड!

BSF मध्ये २३ वर्षांच्या प्रदीर्घ देशसेवेनंतर राजेश मधुकरराव दळवे यांची स्वेच्छा निवृत्ती

सुरेंद्रनाथ दळवी
उमरखेड
देशाच्या सीमेवर २३ वर्षे खडतर सेवा बजावल्यानंतर सीमा सुरक्षा दलातील वरिष्ठ हेड कॉन्स्टेबल राजेश मधुकरराव दळवे यांनी ३१ ऑगस्ट २०२६ रोजी स्वेच्छा निवृत्ती स्वीकारली. मात्र, ही केवळ एका सैनिकाची सेवानिवृत्ती नसून, देशसेवेच्या कर्तव्यापासून आता वडिलांच्या सेवेकडे वळलेल्या एका मुलाच्या त्यागाची भावनिक कहाणी आहे.

हदगाव तालुक्यातील तळणी गावच्या मातीत वाढलेले आणि उमरखेड येथील देशभक्तीने वेडावलेल्या मित्र परिवारातून देशसेवेची ओढ निर्माण झालेले राजेश दळवे, मित्रपरिवारात प्रेमाने ‘राजू’ म्हणून ओळखले जातात. वयाच्या अवघ्या २२व्या वर्षी, १७ जुलै २००३ रोजी त्यांनी सीमा सुरक्षा बलात प्रवेश केला. डोळ्यांत देशसेवेचे स्वप्न आणि मनात काहीतरी वेगळे करण्याची जिद्द घेऊन सुरू झालेला हा प्रवास तब्बल २३ वर्षे सुरू राहिला.या प्रदीर्घ सेवाकाळात राजेश यांनी बांगलादेश सीमा, जम्मू-कश्मीर, छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त भाग तसेच राजस्थान आणि पंजाबमधील पाकिस्तान सीमाभागात कर्तव्य बजावले. देशाच्या सुरक्षेसाठी कुटुंबापासून दूर राहून, सण-उत्सव आणि अनेक कौटुंबिक प्रसंगांना मुकत त्यांनी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले. सेवाकाळातील शेवटची जबाबदारी त्यांनी दिल्ली मुख्यालयातील तांत्रिक विभागात वरिष्ठ हेड कॉन्स्टेबल म्हणून पार पाडली.

राजेश यांच्या आयुष्यात दोन वर्षांपूर्वी काळाने मोठा आघात केला. त्यांच्या आईचे निधन झाले आणि त्या दुःखातून सावरण्याआधीच अवघ्या महिनाभरात त्यांच्या भावाचा अपघाती मृत्यू झाला. आई आणि भावाला अल्पावधीत गमावण्याचा दुहेरी आघात सहन करतानाही राजेश यांनी देशसेवेचे कर्तव्य थांबू दिले नाही.मात्र या घटनांनंतर त्यांच्या मनात एक प्रश्न कायम राहिला—‘आता माझ्या वडिलांसोबत कोण?’
राजेश यांचे वडील सेवानिवृत्त शिक्षक आहेत. मुलांच्या आयुष्याला संस्कार, शिस्त, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठेची दिशा देणाऱ्या या वडिलांनीच राजेश यांच्या व्यक्तिमत्त्वाची पायाभरणी केली. त्याच संस्कारांच्या बळावर राजेश यांनी २३ वर्षे देशाची सेवा केली.देशाच्या सीमेवर हजारो किलोमीटर दूर असलेला मुलगा आणि आयुष्याच्या संध्याकाळी असलेले वडील ही परिस्थिती राजेश यांच्या मनाला सतत अस्वस्थ करत होती.एका बाजूला २३ वर्षांची अभिमानास्पद देशसेवा, अनुभव आणि सैनिक म्हणून मिळवलेली ओळख; तर दुसऱ्या बाजूला वडिलांना आवश्यक असलेली मुलाची साथ. अखेर राजेश यांनी स्वतःच्या कारकिर्दीपेक्षा वडिलांची सेवा मोठी मानत सीमा सुरक्षा बलातून स्वेच्छा निवृत्तीचा निर्णय घेतला.
त्यामुळे ३१ ऑगस्टचा दिवस त्यांच्या आयुष्यातील एका पर्वाचा शेवट आणि नव्या कर्तव्याची सुरुवात ठरला.

कालपर्यंत राजेश देशाच्या सीमांचे रक्षण करत होते; आता ते आपल्या घराच्या उंबरठ्यावर वडिलांचा आधारवड म्हणून उभे राहणार आहेत. कर्तव्याचे ठिकाण बदलले असले, तरी कर्तव्यभावना मात्र तशीच आहे.२३ वर्षे अंगावर असलेला सीमा सुरक्षा बलाचा गणवेश उतरला असला, तरी सैनिकाची शिस्त, धैर्य, संयम आणि कर्तव्यनिष्ठा कधीच निवृत्त होत नाही. देशासाठी आयुष्याची उमेदीची वर्षे देणाऱ्या राजेश यांनी आता आपल्या वडिलांसाठी आयुष्याचा नवा अध्याय सुरू केला आहे. राजेश यांच्या या निर्णयाकडे पाहताना मन भरून येते. देशासाठी दिलेली २३ वर्षे त्यांच्या शौर्याची साक्ष आहेत; तर वडिलांसाठी स्वीकारलेली स्वेच्छा निवृत्ती त्यांच्या संस्कारांची साक्ष आहे.आईचे आशीर्वाद, दिवंगत भावाच्या आठवणी आणि वडिलांचे समाधान यांना सोबत घेऊन राजेश यांच्या आयुष्याची नवी इनिंग सुरू होत आहे. देशाच्या सीमेवर संकटांना सामोरे जाणारा हा सैनिक आता आपल्या कुटुंबासाठी उभा राहणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button