देशी दारूच्या विक्रीमुळे महागावात हाणामारीचे सत्र? प्रभाग क्रमांक ८ मधील मारहाण प्रकरणाने कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह; बीट जमादाराच्या कार्यक्षमतेवर नागरिकांचे सवाल

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव शहरातील देशी दारूच्या अवैध विक्रीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, दारूच्या व्यवहारातून झालेल्या वादानंतर प्रभाग क्रमांक ८ मध्ये मारहाणीची गंभीर घटना घडल्याने शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
२४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ ते ८.३० वाजण्याच्या सुमारास दारूचे पैसे देण्याच्या कारणावरून विठ्ठल किसन वाघमारे यांच्यासोबत अनिल संतोष पांडे यांचा वाद झाला. त्यानंतर वाघमारे यांना मारहाण करण्यात आल्याची तक्रार महागाव पोलिसांत करण्यात आली आहे.
दरम्यान, भांडण सोडविण्यासाठी अंकुश तेजबहादूर ठाकूर (वय ३६) हे मध्यस्थी करण्यासाठी गेले असता त्यांच्यावरही टोकदार हुकाने हल्ला करून चेहऱ्यावर मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी महागाव पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील कलम १०९(१), ११५(२), ३५२ व ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
अल्पवयीन मुलांना दारू विक्रीचा आरोप
महागाव शहरातील देशी दारूच्या दुकानांवर १८ वर्षांखालील मुलांना दारू विकली जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. काही ठिकाणी अल्पवयीन मुलांचा दारूच्या पेट्यांच्या विक्रीसाठी वापर होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या आरोपांची संबंधित विभागाने तातडीने चौकशी करण्याची मागणी होत आहे.
शहरातील गल्लीबोळात खुलेआम दारू विक्री होत असल्याने दारूच्या व्यसनामुळे हाणामारीसारख्या घटना वाढत असल्याचा दावा नागरिकांनी केला आहे.
बीट जमादाराच्या कार्यक्षमतेवर सवाल
ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याची घटना ताजी असतानाच दोन दिवसांत पुन्हा मारहाणीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर अशा घटना घडत असतील तर रात्रीची गस्त आणि बीट व्यवस्थेचे नेमके काय, असा सवाल प्रभागातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.
बीट जमादार व संबंधित पोलिसांनी शहरातील गैरवर्तन करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून दारूविक्रीचे नियम मोडणाऱ्यांवर तसेच कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्यांवर कारवाई करावी. दोन दिवसांत ठोस कार्यवाही न झाल्यास तहसीलदार व ठाणेदारांना निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती प्रभागातील नागरिकांनी दिली.
टीप : अल्पवयीन मुलांना दारू विक्री किंवा अवैध दारूविक्रीबाबतचे आरोप हे नागरिकांच्या तक्रारींवर आधारित असून, संबंधित दुकानदार/प्रशासनाची अधिकृत बाजू तपासणीनंतर स्पष्ट होईल.



